Maharashtra Poliical News Update : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात महत्वाची बातमी आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याबाबत सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाचे सुभाष देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली नाही. दोन्ही गटांकडून वेळ मागण्यात आला. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता सुनावणी ही चार आठवड्यानंतर होणार आहे. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनापीठापुढे ही सुनावणी पार पडणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सुनावणीत खटल्या संदर्भात कालमर्यादा निश्चित आता चार आठवड्यानंतर केली जाऊ शकते. ठाकरे आणि शिंदे गटाकडून वेळ मागून घेण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यावतीने संजय किशन कौल तर सुभाष देसाई यांच्यावतीने कपील सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी हे ज्येष्ठ वकील बाजू मांडणार आहेत. केंद्र सरकारच्यावतीने महाधिवक्ते तुषार मेहता बाजू मांडण्याची शक्यता आहे.  


 राज्यातील सत्तासंघर्षावरील निर्णय पुढे गेला आहे. खरी शिवसेना कोणाची? याचा निवाडा निवडणूक आयोग करेल, असे स्पष्ट करीत बंडखोर शिंदे गटाला दिलासा दिला होता. परंतु, आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि सत्तासंघर्षावेळी निर्माण झालेल्या इतर कायदेशीर पेचांबाबत न्यायालयाने कुठलेही निर्देश दिले नव्हते. अशात आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, दोन्ही बाजुंकडून वेळ मागण्यात आल्याने तारीख पुढे गेली आहे.


16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेण्यापासून आयोगाला रोखावे, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. न्यायालयाने निवडणूक आयोगाला यासंबंधी कोणतीही कार्यवाही न करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आपल्या निर्णयावर स्थापन केलेल्या घटनापीठाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर घातलेली बंदी उठवली होती.