सतिश मोहिते, झी मीडिया, नांदेड : काही दिवसांपूर्वी संविधान सन्मान महासभा घेऊन वंचित बहुजन आघाडीने मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. या सभेच्या माध्यमातून काँग्रेस व वंचितमध्ये जवळीक वाढली होती. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस व वंचित एकत्र येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. मात्र विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये कायमच बाहेर राहिली आहे. काँग्रेसने वंचित बहुजनला कायमच हाताच्या अंतरावर ठेवण्याचेच धोरण आखलं आहे. मात्र आता वंचितने पुन्हा एकदा काँग्रेसला इशारा आणि ऑफर दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभी तक मौका है साथ मे आ जाओ, खासदार आमदार पडल्यानंतर आमच्याकडे रडत यायचं नाही अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी काँगेसला ऑफर आणि सोबतच इशारा दिला. नांदेड जिल्हयातील लोहा येथे आयोजीत निर्धार मेळाव्यात सुजात आंबेडकर बोलत होते. 


"मुंबईच्या संविधान सन्मान महामेळाव्यात येण्यासाठी आम्ही तुम्हाला प्रस्ताव पाठवले. बाळासाहेबांनी मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधींना पत्र पाठवले. पण पृथ्वीराज चव्हाण म्हणतात पत्र मिळाले नाही. मग नाना पटोले राहुल गांधींचे प्रतिनिधी म्हणून का आले असा सवाल सुजात आंबेडकर यांनी केला. आम्हाला सत्तेत येण्याची घाई नाही, आम्ही लढणे सोडणार नाही. तुम्ही आम्हाला सोबत घेतलं नाही. त्यानंतर आम्ही लढलो तर अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण घरी बसले. आता 15 -20 खासदार, 20- 25 आमदार पडले तर आमच्याकडे रडत येऊं नका. तुम्हाला संधी दिली होती. नंतर रडगाणे ऐकनार नाही," असा इशारा देखील सुजात आंबेडकर यांनी काँगेसला दिला आहे.