भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांनी पाठवल्याशिवाय जाणार नाहीत; राज ठाकरेंचा मोठा दावा; म्हणाले `सुप्रिया सुळेही उद्या...`
Raj Thackeray on Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यावर भाष्य केलं आहे. लोकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच शरद पवारांच्या (Sharad Pawar) आशीर्वादानेच हे बंड सुरु असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Raj Thackeray on Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यावर भाष्य केलं आहे. लोकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच शरद पवारांच्या (Sharad Pawar) आशीर्वादानेच हे बंड सुरु असल्याचा गंभीर आरोप केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
राज ठाकरे यांना अजित पवारांनी पुकारलेल्या बंडाबद्दल विचारण्यता आलं असता ते म्हणाले की "महाराष्ट्रात गेल्या दोन अडीच वर्षांपासून जे राजकारण सुरु झालं आहे ते दिवसेंदिवस किळसणावं होत चाललं आहे. या लोकांना मतदारांशी काही देणं घेणं नाही. प्रत्येक पक्षाचे पारंपारिक मतदार असतील ते का त्यांचे मतदार होते, याचा सगळ्यांना विसर पडला आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी वाटेल त्या प्रकारे तडजोड केली जात आहे. महाराष्ट्रात पेव फुटलं असून लोकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे".
मी आगामी काळात मेळावा घेणार आहे. मला महाराष्ट्राशी बोलायचं आहे. यासंदर्भात पुढील काही दिवसांमध्ये माझा महाराष्ट्राचा दौराही लवकरच सुरु होणार आहे. त्यावेळी मी लोकांची भेट घेणार आहे अशी माहिती यावेळी राज ठाकरेंनी दिली.
शरद पवारांना उद्धव ठाकरेंचं ओझं उतरवायचं होतं असा आरोप होत असल्यासंबंधी राज ठाकरे म्हणाले, "अर्थातच...शरद पवार संबंध नाही नाही म्हणत असले तरी दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल असेच पाठवल्याशिवाय जाणार नाहीत. उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही. कशाचं कशाला सोयरसूतक राहिलेलं नाही".
"हा सगळा राजकीय ड्रामाच सुरु आहे. पहाटेच्या शपथविधीने याची सुरुवात झाली. नंतर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती झाली. आता शत्रू कोण, मित्र कोण असं काही राहिलेलंच नाही," अशी टीका राज ठाकरेंनी केली.
दरम्यान, अजित पवारांच्या बंडानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे असे पोस्टर शिवसेना भवनासमोर लागले आहेत. तसंच सोशल मीडियावरुनही अनेकजण ही मागणी करत आहेत. यासंबंधी राज ठाकरेंना विचारण्यात आलं असता त्यांनी काहीही स्पष्ट बोलण्यास नकार दिला. मी मेळावा घेऊन तेव्हा यावर स्पष्ट बोलेन असं सांगत त्यांनी जास्त भाष्य करणं टाळलं.