`कधीपर्यंत लपून बसाल गुवाहाटीत....`, संजय राऊत यांचा बंडखोर आमदारांना इशारा
शिवसेना खासदार संजय राऊत यांचा बंडखोर आमदारांना इशारा, म्हणाले `कधीपर्यंत तुम्ही....`
मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्षावरून घमासान सुरू आहे. एकनाथ शिंदे यांना बंड पुकारलं आणि त्यांच्यासोबत 25 हून अधिक आमदार समर्थन करत गेले. आता उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.
सत्तासंघर्षावरून गेल्या तीन दिवसात जे काही सुरू आहे ते अत्यंत वाईट आहे. पाठीत खंजीर खुपसल्याची भावना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची आहे. त्यांनी बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे.
गुवाहाटीमध्ये कधीपर्यंत लपून बसाल, तुम्हाला चौपाटीवर यावंच लागेल असा निशाणा संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर साधला आहे. त्यांनी ट्वीट करून बंडखोर नेत्यांना हा इशारा दिला.
गुवाहाटीत शिंदे समर्थकांची आज महत्त्वाची बैठक असल्याची माहिती मिळतेय. या बैठकीत शिंदे समर्थकांची पुढील रणनीती ठरणार आहे. तसंच निलंबनाच्या नोटीसीबाबत आज उत्तर देण्याची शक्यता आहे.
गुवाहटीमधल्या हॉटेल रॅडिसनमध्ये शिंदे समर्थकांचा मुक्काम वाढला आहे. 30 तारखेपर्यंतचं आमदारांचं बुकिंग वाढवण्यात आल्याचं समजतंय कायदेशीर लढाई, उपाध्यक्षांवरचा अविश्वास ठराव, इतर पक्षांसोबत चर्चा याला वेळ लागणार असल्यानं बंडखोर 30 तारखेपर्यंत आमदार गुवाहाटीमध्येच थांबणार आहेत.