हेमंत चापुडे, झी मीडिया, खेड : साहेब शब्दावरुन अजित पवार (Ajit Pawar) आणि अमोल कोल्हेंमध्ये (Amol Kolhe) खडाजंगी रंगलीय. त्याला कारण ठरलंय अजित पवारांचं एक वक्तव्य. खेड आळंदीमधील एका कार्यक्रमात अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा रंगलीय. दिलीप मोहिते पाटलांना मंत्रीपदाचं आश्वासन देताना आता आपणच साहेब असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. दिलीप मोहिते पाटील यांची उमेदवारी फिक्स आहे, जागा वाट्याला आली तर त्यांना चांगल्या मताने निवडून द्या, तुमच्या मनात जे मंत्रीपद आहे ते मी पूर्ण करणार आता मीच साहेब, त्यामुळे मंत्रीपद कोणाला द्यायचं ते माझ्यावर सोडा असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमोल कोल्हेंची टीका


अजितदादांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी खरपूस समाचार घेतलाय. केवळ एखाद्या पक्षाचा अध्यक्ष होणं म्हणजे साहेब होत नाही. राज्यात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार असे दोनच साहेब आहेत, अशा शब्दांत खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय. फक्त पक्षाचा अध्यक्ष झालं म्हणजे साहेब होणं नाही तर कुणाच्या जिवावर नाही तर स्वतच्या कर्तृत्वावर उभं रहाणं, संकट आलं म्हणून भूमिका बदलणं यापेक्षा संकट छातीवर झेलणं म्हणजे साहेब असं म्हणत अमोल कोल्हे यांनी सुनावलं आहे.


राज्याच्या राजकारणात साहेब म्हटलं की समोर येतो तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा.. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेससह राजकीय वर्तुळात शरद पवारांना 'साहेब' म्हणून संबोधलं जातं. अजित पवारांच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे गेलं. त्यानंतर पहिल्यांदाच जाहीरपणे अजित पवारांनी आपणच साहेब असल्याचं धाडसी विधान केलंय. आता विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांच्या या वक्तव्याचे काय पडसाद उमटणार हे पाहणं महत्त्वाचंय.