Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीमधून बंड करत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर वारंवार शरद पवार (Sharad Pawar) यांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार यांच्यासह बंड केलेल्या सर्वच नेत्यांनी प्रयत्न केले होते. मात्र त्याविरोधात शरद पवार यांनी आक्रमक होत साथ सोडून गेलेल्यांवर टिकास्त्र सोडलं होतं. अशातच आता शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अजित पवार हे आमचेच नेते आहेत असं सूचक वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे नव्या चर्चा सुरु झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट पडलेली नसून काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. सुप्रिया सुळेंच्या यांच्या या विधानाची चर्चा असतानाच आता शरद पवार यांनी बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना महत्त्वाचं विधान केलं आहे.


काय म्हणाले शरद पवार?


"अजित पवार आमचे नेते आहेतच. त्यात काही वादच नाही. फूट पडणं याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी पडते? जर पक्षातलाच एक मोठा वर्ग देश पातळीवर वेगळा झाला तर फूट पडते. आज तशी स्थिती इथे नाही. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लोकशाहीत त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून त्यावरून लगेच पक्षात फूट पडली म्हणायचं कारण नाही. तो त्यांचा निर्णय आहे," असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.


सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?


"राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही. अजित पवार पक्षातील ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. त्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मात्र, त्याला फूट म्हणता येणार नाही. त्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली असून, त्यावरील उत्तर अद्याप प्रलंबित आहे," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.


शरद पवार भाजपसोबत येतील - चंद्रशेखर बावनकुळे


दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी 2024 च्या निवडणुकीपूर्वी शरद पवार भाजपबरोबर येतील, असं मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार यांना आज ना उद्या वाटेलच मोदीजी या देशाला जगातला सर्वोत्तम देश करण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे कालांतराने का होईना मला विश्वास आहे शरद पवार मोदींच्या नेतृत्वातील भारत निर्माण करण्यासाठी मदत करतील. शरद पवार यांना मोदींचा विकास त्यांना कळतो तेही प्रगल्भ नेते आहेत. त्यामुळे इंडिया नाव तयार करून जी मोठ बांधली गेली त्यात काही दम नाही. देशाला स्थेर्य देण्याकरता पंतप्रधान मोदी पाहिजेत. आज ना उद्या मन परिवर्तन होईल," असे वक्तव्य बावनकुळे यांनी केलं आहे.


त्यावर उत्तर देतान शरद पवार चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. 'काहीही प्रश्न काय विचारता. तुम्ही अक्कल तरी वापरा,' असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिलं आहे.