Ajit Pawar in Baramati : उपमुख्यमंत्री अजित पवारांचं (Ajit Pawar) आज बारामतीमध्ये जोरदार जंगी स्वागत करण्यात आलं. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांचा हा पहिलाच बारामती (Baramati) दौरा आहे. बारामतीत अजितदादांवर जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यांच्यावर जेसीबीमधून फुलं उधळण्यात आली. अजित पवारांच्या स्वागताला चांगलीच गर्दी झाली होती. तब्बल 65 दिवसांनंतर अजित पवार मतदार संघात आले. मोरगावच्या मयूरेश्वराच्या दर्शनानंतर अजित पवारांनी बारामती दौऱ्याला सुरुवात केली. रस्त्याच्या दुतर्फा कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुपरमॅनची एन्ट्री
उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीत जंगी स्वागत झालं, त्यावेळी एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं.. अजित पवारांचं स्वागत करण्यासाठी एका कार्यकर्त्यानं स्वतःला चक्क क्रेनला लटकून घेतलं होतं. अजित पवारांचं स्वागत करण्यासाठी त्यानं हातात हार घेतला होता. अजित पवारांची रॅली (Rally) जवळ येताच या कार्यकर्त्यानं क्रेनमधून लटकूनच अजित पवारांना हार घातला. अजित पवारांनीही या कार्यकर्त्याचा हार घालून घेतला.  


सपत्नीत पूजा आणि गणपतीची आरती
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतल्या सुपा पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचं उदघाटन केलं. अजित पवारांनी या इमारतीची बारकाईने पाहणी केली. त्यानंतर अजित पवार मोरगावात दाखल झाले. मयूरेश्वराचं त्यांनी दर्शन घेतलं. अजित पवारांनी मोरगावच्या मयूरेश्वर मंदिरात सपत्नीक पूजा केली त्यानंतर गणपतीची आरतीही केली. 


'अजितदादांचा परमनेंट बंदोबस्त'
दरम्यान, शरद पवार ज्या जिद्दीनं मैदानात उतरलेत ते पाहून  ते अजित पवारांचा परमनंट बंदोबस्त करतील असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय.. तर वडेट्टीवार नवे नवे विरोधीपक्षनेते आहेत. आपण मोठे नेते आहोत हे त्यांना काँग्रेस पार्टीला दाखवावं  लागतं त्यातून ते अशी विधानं करत असल्याची टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी केलीये.


'अजित पवार आमचे नेते'
शरद पवारांच्या मनात नेमकं चाललंय काय, याचा थांगपत्ता कुणालाच लागत नाही. याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना शिंगावर घेतलं. मात्र अजित पवार आमचेच नेते आहेत, असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी आधी केलं. शरद पवारांनीही त्याचीच री ओढली. त्यामुळं महाविकास आघाडीचे नेते पुन्हा बुचकळ्यात पडले. पवारांच्या नव्या गुगलीमुळं ते तळ्यात आहेत की मळ्यात हेच कळेनासं झालंय. एकीकडं इंडिया आघाडीच्या बैठकांना ते हजेरी लावतायत. 31 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या बैठकीतही ते सहभागी होणार आहेत. तर दुसरीकडं लवकरच ते एनडीएत सामील होतील, अशी आशा भाजपला वाटतेय.