बारामतीहून जावेद मुलानीसह अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) फुटल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) आणि रोहित पवार (Rohit Pawar) या काकापुतण्यात विस्तव जात नाही. अजित पवार तर रोहित पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते. रोहित पवारांना अजित पवारांची जागा घेण्याची घाई झाल्याची टीका अजितदादा समर्थकांनी यापूर्वीही केली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात तर दोघा काका पुतण्यांमधील वाद विकोपाला गेला होता. आता विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस असताना अजित पवारांनी पुतणे रोहित पवारांचं कौतुक केलंय. रोहित पवार जामखेडमध्ये चांगलं काम करत असल्याची प्रशंसा अजित पवारांनी केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार एकदम रोहित पवारांच्या कौतुकाचे दोहे कसे गाऊ लागले असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय.  आपलं कामच दमदार आहे त्यामुळंच विरोधक कौतुक करत असतील असं रोहित पवार म्हणालेत. लोकांच्या आशीर्वादाने मी कर्जत जामखेड मध्ये निवडून आलेलो आहे. प्रामाणिकपणे कुटुंब सारखा मतदारसंघ जपला आहे. माझं कामच दमदार असेल तर विरोधक कौतुक करत असतील तर चांगली गोष्ट आहे. विकास कामांबाबत केलं असेल तर दादाचं स्वागत आहे. मला लोक परत निवडून देतील असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 


अजितकाकांनी कौतुक केल्यानंतर सुप्रियाआत्या कशा मागे राहितील. खासदार सुप्रिया सुळे यांनीही अजितदादांची री ओढत रोहितचं कौतुक केलंय


रोहित पवारांवर मोठी जबाबदारी देणार असल्याचं शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलंय. दुसरीकडं युगेंद्र बारामती लढण्याची तयारी करतोय. एकाच वेळी दोन पुतण्यांशी दोन हात करण्यापेक्षा एका पुतण्याचं कौतुक करुन टीकेची धार बोथट करण्याचा अजित पवारांची खेळी तर नाही ना अशी शक्यता व्यक्त केली जातेय.