विधानसभेसाठी पीएम मोदींनी फुंकलं रणशिंग, महिनाभरात मोदी तिसऱ्यांदा महाराष्ट्रात
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार महाराष्ट्रात येत आहेत. लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 पेक्षा जास्त सभा महाराष्ट्रात घेतल्या होत्या.
Maharashtra Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महिनाभरामध्ये तिसऱ्यांदा महाराष्ट्रात आले. वर्ध्यात (Wardha) मोदींच्या हस्ते विविध योजना आणि प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं. मोदींनी वर्धा दौऱ्यात कर्नाटकातल्या गणपती मूर्ती प्रकरणावरुन विरोधकांवर खास करुन काँग्रेसवर तोफ डागली. शाही परिवार म्हणत मोदींनी राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबावर टीका तर केलीच. मात्र काँग्रेस पक्ष देशातील सर्वात मोठा भ्रष्ट पक्ष असल्याचा आरोपही मोदींनी केलाय. विधानसभा निवडणुकांआधी मोदींनी महाराष्ट्रात खास लक्ष घातल्याचं दिसतंय. खासकरुन विदर्भात. कारण लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) विदर्भात मोठा फटका बसला होता. तर मविआने विदर्भात घवघवीत यश मिळवलं होतं.
लोकसभेला विदर्भात महायुतीला नुकसान
लोकसभेच्या 10 जागांपैकी विदर्भात फक्त दोनच जागांवर भाजपला विजय मिळवता आला होता. यापैकी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा एक खासदार निवडून आला. 2019 च्या तुलनेत भाजपला तीन आणि शिवसेनेचं दोन जागांवर नुकसान झालं. तर दुसरीकडे काँग्रेसने विदर्भात पाच जागा जिंकल्या. 2019 च्या तुलनेत काँग्रेसने 4 जागा जास्त जिंकल्या. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एक आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एक जागा जिंकली.
पीएम मित्रा योजना
पीएम मित्रा योजनेअंतर्गत मोदी सरकारने अमरावतीमध्ये घोषित केलेल्या मेगा इंटीग्रेटेड टेक्सटाईल पार्कची पायाभरणी पीएम मोदींनी केली. अमरावतीच्या प्रकल्पात 10 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. तर तब्बल 3 लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याने मोठ्या प्रमाणावर विदर्भातील युवकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळेच मोदींनी खास करुन विदर्भातून विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याचं दिसून येतंय. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने महाराष्ट्रात दौरे करत आहेत.
पीएम मोदींचा महाराष्ट्र दौरा
13 जुलैला मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचं तसंच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या कामाचं भूमिपूजन मोदींनी केलं होतं.
25 ऑगस्टला मोदी जळगावच्या दौ-यावर होते.. लखपती दीदी कार्यक्रमात त्यांच्या हस्ते महिलांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं होतं.
30 ऑगस्टला मोदी पालघर दौ-यावर होते... 76,000 कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदर प्रकल्पाचं भूमिपूजन मोदींनी केलं होतं.. याच दौ-यात शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरुन मोदींनी माफीसुद्धा मागितली होती..
येत्या 5 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहरादेवीमध्ये विकास कामांचं लोकार्पण करणार आहेत.
संविधान बदलणार या नॅरेटिव्हनंतर भाजपपासून मागासवर्ग मतदार दूर गेला होता. मात्र या मतदारांना परत जोडण्याची सुरुवात भाजपने केलेली दिसतेय.. वर्धा दौऱ्यात पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. ओबीसी, दलित आणि आदिवासी वर्गाला जोडण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येतोय. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचे महाराष्ट्रातले हे दौरे महत्त्वाचे मानले जात आहेत.