गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम : शिवसेनेत (Shvisena) फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत (CM Eknath Shidne) गेलेल्या वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) अडचणीत सापडल्या आहेत. राज्यात महायुतीचे तर केंद्रात एनडीएचे सरकार आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाच्या वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या संस्थेचे खाते आयकर विभागाने (IT) गोठवले आहे. त्यामुळे खासदार भावना गवळी यांना मोठा झटका बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती आयकर विभागाने गोठवली आहेत. 29 डिसेंबर रोजी आयकर विभागाने भावना गवळी यांना नोटीस दिली होती. आयकर विभागाने पाच जानेवारीपर्यंत भावना गवळी यांना आपलं म्हणणं मांडायला सांगितले होते. मात्र भावना गवळी प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहिल्या नाहीत. त्यांनी प्रतिनिधी पाठवून नोटीसला उत्तर दिलं होतं. मात्र त्यावर आयकर विभागाचे समाधान झालं नाही. त्यानंतर आयकर विभागाने अखेर महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती गोठवली आहेत.


भावना गवळी यांच्या संस्थेवर याआधी पण छापे पडले होते. त्यातच आयकर विभागाने त्यांना 29 डिसेंबरला नोटीस पाठवून 5 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. 8.26 कोटी रुपयांचा आयकर न भरल्यामुळे अखेर भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती गोठवण्यात आली आहेत.


महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेत 24 कोटी रुपयांची अफरातफर आणि त्यातून सात कोटी रुपये चोरीला गेल्याची तक्रार 12 मे 2020 रोजी गवळी यांनी रिसोड पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र या संदर्भातील आयकर भरला नसल्याची बाब समोर आल्यानंतर त्यांना आयकर विभागाने ही नोटीस जारी केली होती.


याआधीही आल्या होत्या अडचणीत


भावना गवळी यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. भावना गवळींनी 55 कोटींचा बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना 25 लाख रुपयात घेतला. 2019 मध्ये रिसोड येथील जनशिक्षण संस्था व महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या कार्यालयातून सात कोटी रुपये चोरून नेल्याची तक्रार गवळी यांनी केली होती. 7 जुलै 2019 रोजीच्या चोरीची तक्रार 12 मे 2020 रोजी केली. 10 महिने उशिरा तक्रार देण्याचे कारण काय?, त्या कार्यालयात 7 कोटी कुठून आले? असा सवाल सोमय्या यांनी विचारला होता. या संदर्भात केंद्रीय सहकार मंत्री, सीबीआय, ईडी, स्टेट बँक, नॅशनल को- ऑप. डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व अन्य ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर ईडीने 30 ऑगस्ट रोजी भावना गवळींच्या रिसोड अर्बन सहकारी पतसंस्था, आयुर्वेद महाविद्यालय, भावना पब्लिक स्कूल, डी.फॉर्म महाविद्यालय, पुंडलिकराव गवळी महाविद्यालय, शिरपूर जैन या संस्थांमध्ये धाडी टाकण्यात आल्या.