Uddhav Thackeray Banner : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा (Shivsena UBT) आज ठाण्यात मेळावा होणार आहे. संभाजीनगर आणि पुण्यातील शिवसंकल्प अभियानानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) तोफ धडाडणाराय. भगवा सप्ताहानिमित्त ठाकरे गटाचा भव्य मेळावा ठाण्यात (Thane) आयोजित करण्यात आलाय. उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. ठाणे लोकसभेत झालेल्या पराभवानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी शिवसैनिकांना विजयाचा आत्मविश्वास देण्यासाठी मेळावा असल्याचं बोललं जातंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरेंविरोधात बॅनरबाजी
उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी ठाण्यात अज्ञात व्यक्तींनी वादग्रस्त बॅनर (Banner) लावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झालंय. या बॅनरवर 'घालीन लोटांगण वंदीन चरण' असं लिहून उद्धव ठाकरे यांचं व्यंगचित्र दर्शविण्यात आलंय. या बॅनरमुळे संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घालत बॅनर काढलाय. लोकसभेत पराभव झाल्याने आज शिवसेनेचा वाघ या ठिकाणी येत असल्याची धास्ती मनात धरून हे बॅनर लावण्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. तर हिंमत असेल तर नावाने बॅनर लावा असे आव्हान देखील यावेळेस ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलंय.


उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप
दुसरीकडे दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी घोटाळ्याचे आरोपी असलेल्या गुप्ता बंधूंशी भेट घेतल्याचा गंभीर आरोप खासदार नरेश म्हस्केंनी केलाय. दक्षिण आफ्रिकेतील अब्जावधी रँड्सचा घोटाळा केल्याचा आरोप गुप्ता बंधूंवर आहे. आफ्रिकन देशाच्या मालकीच्या सरकारी उद्योगांमधून अब्जावधींची लूट केल्याप्रकरणी गुप्ता बंधूंवर गुन्हा दाखल आहे. अतुल गुप्ता, अजय गुप्ता आणि राजेश गुप्ता यांच्यावर माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी जवळीक साधून दक्षिण आफ्रिकेत अब्जावधी रँड्सचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. जेकब झुमा 2018 मध्ये अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर हे तिघे आणि त्यांचे कुटुंबीय दुबईला पळून गेले होते. तिथे त्यांना अटकही झाली होती. याच गुप्ता बंधूंना ठाकरे भेटल्याचा दावा म्हस्केंनी केलाय. तर दौरा यशस्वी झाल्याने बदनामीचा डाव असल्याचा पलटवार सचिन अहिर यांनी केलाय..


'ते कार्यकर्ते आमच्या पक्षाचे नाहीत'
बीडमध्ये राज ठाकरेंविरोधात झालेलं सुपारी फेक आंदोलन आमच्या पक्षाचं नव्हतं. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, मात्र सुपारी फेकण्याची भूमिका पक्षाची नव्हती अशी माहिती संजय राऊतांनी दिलीय. काल बीडमध्ये राज ठाकरेंच्या गाडीसमोर सुपारी फेकून आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावर बोलताना राऊतांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना इशारा दिलाय.. आम्हाला धमक्या इशारे देऊ नका, भाजपला द्या असं राऊतांनी म्हटलंय. तर ही शिवसेना हिजबुल्लाची विचार करणारी आहे. तुम्ही हल्ला केला असेल तर सांगा ना.  असं प्रतिआव्हान संदीप देशपांडेंनी दिलाय.