Maharashtra Politics : भाजपाने सोमवारी आपले सहकारी पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि त्यांच्या आमदारांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक एम.एस. गोळवलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागपूरच्या रेशमबागेत निमंत्रित केले होते. यासाठी आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटातील आमदारांना पत्राद्वारे आमंत्रित केले होते. सर्व मंत्री, आमदार आणि आमदारांची उपस्थिती अनिवार्य आहे, असे या कार्यक्रम पत्रिकेत म्हटलं होतं. शिंदे गटाच्या आमदारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली तर अजित पवार गटाने याकडे पाठ फिरवली होती. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी रेशीमबागेत जाऊन डॉ. हेगडेवारांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमावर अजित पवार गटाचे विधानपरिषद अमोल मिटकरी यांनी विधानभवन संकुलात पत्रकारांशी बोलताना याबाबत भाष्य केले होते. तिथे जायचे की नाही हा आमचा अधिकार आहे. विशिष्ट ठिकाणी जायचे की नाही हा प्रत्येक पक्षाचा विशेषाधिकार आहे, असे मिटकरी म्हणाले होते. तर भाजपने राष्ट्रवादीला निमंत्रित केले होते हे खरे आहे, पण तिथे कोणीही गेले नाही, असेही एका आमदाराने म्हटलं. दुसरीकडे, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार भरत गोगावले, मनीषा कायंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी स्मृतिस्थळावर आदरांजली वाहिली.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी नागपूरातल्या रेशीमबाग येथे जाऊन डॉ. हेगडेवारांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. "हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये असेल की आम्ही सरसंघचालक हेगडेवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट देत असतो. गेल्यावर्षी देखील आलो होतो. हा अतिशय चांगला परिसर आहे. इथून उर्जा आणि प्रेरणा देखील मिळते. म्हणून आम्ही या ठिकाणी येतो," असे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.


अजित पवार गटातील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले होते की, उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवारी सकाळी आठ वाजता स्थानिक वृत्तपत्रांच्या संपादकांशी संवाद साधणार आहेत, त्यामुळे ते आरएसएसच्या स्मारकाला भेट देण्याची शक्यता नाही. दुसरीकडे, जुलैमध्ये राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार यांनी आपण आपली धर्मनिरपेक्ष ओळख सोडणार नसल्याचा दावा वारंवार केला होता.