Maharashtra Politics : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात कोल्ड वॉर रंगल्याची चर्चा आहे. पुण्यातल्या अजित पवारांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे चंद्रकांत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे.. अजित पवारांच्या  मे महिन्यात पुणे जिल्हा नियोजन समिती बैठकीत 400 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. खुद्द शरद पवार या बैठकीत उपस्थित होते. पण अर्थमंत्री अजित पवारांकडून निधीला अद्याप मंजुरी देण्यात आली नसल्याची तक्रार चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे (CM Eknath Shinde) केल्याचं समजतंय. गणेशोत्सव मंडळांसोबतच्या बैठकीतही दोन्ही नेते एकत्र होते मात्र पालकमंत्री चंद्रकाच पाटलांऐवजी अजित पवारच माध्यमांना सामोरे गेले. त्यामुळे पुण्यात दादा विरुद्ध दादा असं शीतयुद्ध (Cold War) रंगल्याची चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रकांतदादांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
मे महिन्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीत 400 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजूरी देण्यात आली. बैठकीचे इतिवृत्त 1 जुलैला तयार झालं आणि ते मंजुरीसाठी प्रशासनाकडे पाठवण्यात आलं. पण 2 जुलैला अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि इतिवृत्त मंजुरीअभावी रखडलं. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यातच पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांची नियुक्ती होणार असं बोललं जात आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात नाराजी आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटीलचं कायम राहावेत यासाठी भाजप (BJP) आग्रही आहे. 


अजित पवारांचा बैठकांचा सपाटा
चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री (Guardian Minister) असले तरी गेल्या आठवडाभर अजित पवार यांनी पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये बैठकीचा सपाटा लावला आहे. पुणे जिल्हाधिकारी, पुणे महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त अशा एकामागोमाग एक बैठक घेतल्या. विशेष म्हणजे या बैठकांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाच आमंत्रण नव्हतं. त्यामुळे अजित पवार चंद्रकांत पाटील यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. 


अजित पवार हे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पण प्रशासकीय बैठका ते पुण्यात घेत आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधल्याच दोन मंत्र्यांचं एकमेकांना आव्हान असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 


राष्ट्रवादीकडून पालकमंत्र्यांवर दबाव?
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून इतर पक्षातल्या पालकमंत्र्यांना दाबण्याचा प्रयत्न महायुती सरकारमध्ये सुरु झाल्याचं बोललं जातंय.. राष्ट्रवादीचं वजन असणाऱ्या भागात राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून इतर पक्षातील पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा, त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाचे काही पालकमंत्री नाराज असल्याचं बोललं जातंय. पालकमंत्रीपदासाठीच राष्ट्रवादीकडून हे दबावतंत्र असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय.