Maharashtra Politics : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं (Swatantrya Veer Savarkar) कौतुक केलंय. आपल्या राजकीय आणि सामाजिक अनुभवांच्या आठवणींवर आधारीत 'फाईव्ह इन डिकेड्स पॉलिटिक्स' हे आत्मचरित्र सुशीलकुमार शिंदेंनी लिहिलंय. त्यात राजकारणातल्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिलाय.. याच पुस्तकार सुशीलकुमार शिंदेंनी सावरकरांवर स्तुतीसुमनांची उधळण केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय लिहिलंय पुस्तकात?


'स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल माझ्या मनात उच्च कोटीचा आदर आहे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर असल्यानेच 1983 ला नागपुरात सावरकरांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित राहिलो. सावरकर यांच्याबद्दल माझी काही स्पष्ट मते आहेत. मी स्वत: मागासवर्गीय समाजातून येत असल्याने सावरकर यांनी अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण्यासाठी केलेले प्रयत्न मला चांगले माहिती आहेत. ते प्रयत्न माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत.


सावरकरांबद्दल बोलताना या मुद्द्याकडे लक्ष न देता हिंदुत्ववादी विचारसरणीवर इतका भर का दिला जातो? सावरकरांबद्दल बोलताना त्यांच्या विज्ञानवादी विचारावर आपण का बोलत नाही? दलितांच्या उद्धाराचा मुद्दा घेऊन सावरकरांनी आयुष्यभर काम केले. सावरकरांबद्दल संकुचित विचार हे काँग्रेस समोरचे आव्हान आहे. काँग्रेस पक्षात जवळपास 50 वर्षे काम केल्यानंतर मला असे वाटते की, काँग्रेसच्या विचारसरणीत सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे' असं सुशीलकुमार शिंदेंनी या पुस्तकात म्हटलंय.


काँग्रेस नेते राहुल गांधींनी सतत सावरकरांचा उल्लेख माफीवीर असा केलाय. काँग्रेसची सावरकरांबद्दल विरोधाची स्पष्ट भूमिका असताना सुशीलकुमार शिंदेंनी स्तुतीसुमनं उधळल्याने काँग्रेस पक्षाची चांगलीच अडचण झाली आहे.


सावरकर आणि वाद


- अंदमान-निकोबारला असताना काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्याकडून सावरकरांची नेमप्लेट हटवण्याचे निर्देश


- बाळासाहेब ठाकरेंकडून मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला 'जोडे मारो' आंदोलन


- माफीवीर तसंच पेन्शनवीर म्हणत राहुल गांधींची सावरकरांवर वारंवार टीका


- 26 मार्च 2023 च्या मालेगावच्या उद्धव ठाकरेंनी सावरकरांच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींना सुनावलं होतं


- काँग्रेस-शिवसेना आघाडीनंतर सावरकरांच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंची कोंडी झालेली पाहायला मिळाली होती.


सावरकरांवरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये नेहमीच संघर्ष राहिलाय. भाजप आणि काँग्रेसमध्ये सावरकरांच्या मुद्द्यावरुन टोकाचं राजकारण रंगतं. आताही निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात पुन्हा सावरकरांच्या मुद्द्यावरुन वाद पेटताना दिसणार आहे. मात्र त्याचवेळी काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंनी आपल्या आत्मचरित्रात सावरकरांचं कौतुक केल्याने काँग्रेसची कोंडी झाल्याचं दिसतंय.