एवढं निर्लज्जपणे बोलायचं असेल तर राजीनामा द्या; दीपक केसरकर यांचे संजय राऊत यांना आव्हान
Maharashtra Politics : तुम्ही अनेकांजवळ आपण शरद पवार यांचे माणूस असल्याचे बोलून दाखवल आहे. तुम्ही त्यांचे असाल तर राष्ट्रवादी मध्ये चला असेही दीपक केसरकर म्हणाले.
Maharashtra Politics : इराण आणि इराकमध्ये ज्या पद्धतीने जनेतेने हुकूमशाही असलेल्या लोकांना जनतेने रस्त्यावर उतरून मारलं होतं तसंच 2024 नंतर या लफंग्यांना जनता रस्त्यावर उतरून मारेल, अशा शब्दात ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केल्यानंतर आता मोठा वाद सुरु झाला आहे. इचलकरंजीमध्ये एक गद्दार खासदार जनतेचा मार खाता-खाता वाचला. जनतेने त्यांची गाडी अडवली, त्यांच्याविरोधात घोषणा दिल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यावर आता शिवसेनेचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा - दीपक केसरकर
"ज्यांना पाठीचा कणा नसतो तिच लोक अशी वक्तव्ये करतात. आमच्या 40 आमदारांच्या मतांवर संजय राऊत निवडून आलेले आहेत. एवढं जर निर्लज्जपणे त्यांना बोलायचं असेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. आणि पुन्हा राज्य सभेमध्ये निवडून यावं," असे आव्हान दीपक केसरकर यांनी दिलं आहे.
"संजय राऊत तुम्ही तुरुंगात जाऊन आलेले आहात त्यामुळे लौकिक अर्थाने लफंगे कोणाला म्हणतात हे डिक्शनरीमध्ये लिहिलेलं असत. लोकांना जे फसवतात लोकांच्या कष्टाच्या घरावर जे डल्ले मारतात. त्यांनी ही भाषा बोलू नये. तुम्ही एक चांगले नेते आहात म्हणून आम्ही तुमचा मान ठेवतो आणि तो आपण घ्यावा. नाही तर आम्हाला ही बोलता येते मात्र तुमच्या सारखं असंस्कृत बोलता येत नाही. तुमच्यामुळे शिवसेनेची शकले झाली. तुम्ही शिवसेनेला नेऊन राष्ट्रवादीच्या दावणीला बांधले. तुम्ही 80 टक्के पवारांचे माणूस आहात. आदित्य, उद्धव ठाकरे यांना कस संपवायचं याचा सगळा प्लॅन तुम्हीच बनवला आहे. त्याची सर्व कार्यवाही तुम्हीच केली आहे. तुम्ही अनेकांजवळ आपण पवारांचे माणूस असल्याचे बोलून दाखवल आहे. तुम्ही पवारांचे असाल तर राष्ट्रवादी मध्ये चला. उगाच इथे राहून वाटेल ते बोलत राहू नका," असेही दीपक केसरकर म्हणाले.
तुम्ही झोपा आणि स्वप्न बघत राहा
"तुम्हाला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आमच्या जवळ अनेक प्रवक्ते आहेत. तुम्हाला कंटाळून अर्धे लोक बाहेर पडले ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही जो शिवसेनेचा गेम केलेला आहे तो आता संपलेला आहे. एक प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेना संपवायची हे तुमच्या मनात होते. ते आम्ही कदापिही होऊ देणार नाही. तुम्ही झोपा आणि स्वप्न बघत राहा सरकार कोसळणार नाही. उद्धव ठाकरे यांचा राजीनामा कोणीही मागितला नहोता उलट जेव्हा 28 आमदार रागावून निघून गेले तेव्हा आम्ही त्यांना भेटलो व घराला लागलेली आग विजवूया असे सांगितले तेव्हा त्यांनी आम्हाला तुम्ही पण निघून जा," असे आव्हान दीपक केसरकर यांनी दिले आहे.