Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 2024 पूर्वी भाजप कार्यकर्त्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. विजयाबद्दल आत्मसंतुष्ट होऊ नका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका गांभीर्याने घ्या असा सल्ला फडणवीसांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय निश्‍चित आहे, असे समजून मैदानात उतरून काम करणे थांबवू नका, असाही इशारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी या सूचना दिल्या आहे. या निवडणुकीत जनतेचे प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा लागेल. जेणेकरून अधिकाधिक लोक भाजपच्या विचारसरणीशी जोडले जातील. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका हलक्यात घेण्याची गरज नाही, असा सल्ला त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे. तसेच या निवडणुकीत उमेदवार निवडीतही प्रस्थापितांसाठी धक्कातंत्र वापरले जाण्याचे संकेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्यांनी कोणत्याही प्रकारचे दबावतंत्र वापरल्यास त्यांचा विचार केला जाणार नाही असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे उमेदवार जाहीर होण्याची वाट न बघता 31 जानेवारीपर्यंत लोकसभा तर 14 फेब्रुवारीपर्यंत विधानसभानिहाय भाजपची निवडणूक कार्यालये सुरू करण्याचे आदेश सहराष्ट्रीय सरचिटणीस शिवप्रकाश यांनी दिले आहेत.


भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून उमेदवारासाठी कोणीही नेत्याने पक्षाला गृहीत धरू नये. निवडून येण्याची क्षमता व अन्य बाबी पाहून उमेदवारीबाबत संसदीय मंडळाकडून निर्णय घेतला जाईल. बॅनरबाजी किंवा अन्य माध्यमातून दबाव आणणाऱ्यांना उमेदवारी मिळणार नाही, असा कठोर इशारा फडणवीस यांनी दिला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि त्याआधी गुजरात व अन्य राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने प्रस्थापित नेत्यांना धक्का दिला आणि प्रस्थापित आमदारांना उमेदवारी नाकारली होती. शिवराजसिंह चौहान, वसुंधराराजे यांच्यासह मातब्बर नेत्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी न देता नवीन चेहऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्याच प्रकारचे धोरण लोकसभा निवडणुकीतही राबवणार असल्याचे  भाजपने सांगितले आहे.


या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना सामान्यांपर्यंत पोहोचण्याचा सल्ला दिला आहे. भाजपची व्होटबँक असलेल्या सर्वसामान्य आणि गरिबांशी त्यांनी जोडले पाहिजे. आपला विजय निश्चित आहे असे सांगून प्रयत्न थांबवू नका. तिकीट कोणाला मिळेल याची काळजी करू नका. भाजप कार्यकर्त्यांनी गरीब, शेतकरी, महिला आणि तरुणांवर लक्ष केंद्रित करायला हवा. नरेंद्र मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील या चार घटकांना झाला आहे. जातीसंबंधित अनेक समस्या आहेत, मात्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जातीचा विचार करू नये, असेही देवेंद फडणवीस म्हणाले.