`महाविकास आघाडीच्या बैठकांना जाऊ नका`; प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्याना आवाहन
Vanchit Bahujan Aghadi : महाविकास आघाडीच्या बैठकांना उपस्थित राहू नका असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडीओद्वारे हे आवाहन केलं आहे.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : लोकसभा निवडणुकांसाठी काही दिवसांचा वेळ उरला असताना प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीची अद्याप महाविकास आघाडीसोबत जाण्याबाबत चर्चाच सुरु आहेत. जागावाटपासाठी ठेवलेल्या अटींमुळे ही युती थांबल्याचे बोललं जात आहे. यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत सातत्याने चर्चा सुरु आहेत. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आवाहन केलं आहे.
वंचित बहुजन आघाडीने 27 जागांवर लढण्याची तयारी केल्याचे पत्र महाविकास आघाडीतल्या नेत्यांना दिले होते. मात्र वंचितची जागांची मागणी पाहता तिन्ही पक्षांचे गणित बिघडू शकते. त्यामुळे मविआच्या नेत्यांकडून अद्यापही कोणती घोषणा केलेली नाही. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांनीही व्हिडीओद्वारे वंचित बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.
महाविकास आघाडीच्या बैठकांना उपस्थित राहू नका अशा सूचना वंचित बहुजन आघाडीने कार्यकर्त्यांना केल्या आहेत. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं आहे. "वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाहीये. त्यामुळे इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाला बोलावत असतील तर त्या बैठकी, कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये. ॲड. प्रकाश आंबेडकर व पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांची सूचना येईपर्यंत कोणीही सहभागी होऊ नये," असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांच्यामार्फत करण्यात आलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर जाण्याचा विचार करु शकतो - प्रकाश आंबेडकर
नागपुरात पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर जाण्याचा विचार करु शकतो असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. "आमचा कोणताही राजकीय अजेंडा नाही. सामाजिक परिवर्तनावर आमचा विश्वास आहे. समाजिक परिवर्तन करताना सत्ता मिळाली तर आम्ही निश्चित घेणार. आताची परिवर्तनाची जी गरज आहे. जातीवर आधारित पुरोहित आहेत. आज कुंभाराचं मुलं, लोहाराचं मुलं पुरोहित म्हणून त्याच्या समाजातच मान्यता आहे. इतर समाजात त्याला मान्यता नाही. समाजामध्ये समता आणि अधिकार या दोन्ही गोष्टी आणायच्या असतील तर हे असे प्रकार सिम्बॉलिक आहेत असं आम्ही मानतो. आता जातीवर आधारित जे पुरोहित आहेत ती पूर्ण कायद्याने बंदी घातली जाईल. हिंदू स्कूल ऑफ थिओलॉजी उभं केलं जाईल. त्यामधून जो पुरोहितबाहेर पडेल त्यालाच या देशात धार्मिक विधी करता येतील. त्यांच्या मार्फतच विधी करुन घेतल्या जातील असा कायदा आणि सुधारणा करायला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तयार असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा विचारही करु शकतो," असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.