मोठी बातमी! शरद पवार, अजित पवार दोघांनाही निवडणूक आयोगाची नोटीस
Sharad Pawar vs Ajit Pawar : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. निवडणूक आयोगाने आता दोन्ही नेत्यांना दिल्लीत हजर होण्यासाठी नोटीस बजावली आहे.
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतील (NCP) फुटीनंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नोटीस बजावत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पक्षचिन्ह आणि पक्षाच्या नावासाठी शरद पवार गट आणि अजित पवार गटात निवडणूक आयोगामध्ये लढाई सुरु आहे. अशातच दोन्ही गटाच्या नेत्यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.
निवडणूक आयोगाने शरद पवार आणि अजित पवार यांनी नोटीस बजावत दिल्लीत शुक्रवारी तीन वाजता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाकडे संघटन कुणाचे याबाबत म्हणणं मांडले जाणार आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांना निवडणूक आयोगासमोर हजर राहावं लागणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर निवडणूक आयोगापुढे दोन्ही गटांनी आपलं म्हणणं लेखी स्वरुपात मांडत पक्षावर दावा केला आहे. यासंदर्भातील माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. आता याचा पुढचा टप्पा म्हणजे दोन्ही नेत्यांना निवडणूक आयोगासमोर हजर राहावं लागणार आहे.
मात्र आता शरद पवार हे निवडणूक आयोगासमोर उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वकिल अभिषेक मनु सिंघवी हे शरद पवार गटाची बाजू मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यापूर्वी शरद पवार गटातर्फे 9 हजार शपथपत्र आयोगाकडे सादर करण्यात आली होती. तर अजित पवार गटातर्फे 5 हजार शपथपत्रे दाखल करण्यात आली आहेत. तसेच अजित पवार गटावरच शरद पवारांनी आक्षेप घेतला आहे. राष्ट्रीय अध्यक्षपद निवडीसाठी प्रस्तावक छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे होते. या चारही नेत्यांच्या सहमतीनेच शरद पवारांची निवड करण्यात आली होती. तसेच अजित पवार गटातर्फे निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात त्रुटी आढळून आल्या आहेत. राज्यातील एक शिक्षणचालकांनी 98 जणांची शपथपत्र भरून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिली होती. त्यापैकी तर एक शपथपत्र देणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू दोन वर्षांपूर्वी झालाय. त्याच्या नावानं शपथपत्र देण्यात आल्याचा दावा शरद पवार गटाने केला आहे.