रामदास कदम यांना तगडं आव्हान देण्यासाठी ठाकरे गटाची नवी खेळी; घेतला मोठा निर्णय
Maharashtra Politics : रत्नागिरीत चार पैकी दोन आमदार हे शिंदे गटात दाखल झालेत. त्यामुळे कोकणात ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे. रामदास कदम यांनीही सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला आहे.
Maharashtra Politics : शिवसेनेतील (Shivsena) मोठ्या फूटीनंतर राज्यात मोठं सत्तांतर घडून आलंय. काही महिन्यांपूर्वी राज्यातील महाविकास आघाडीचे (maha vikas aghadi) सरकार कोसळून शिंदे - फडणवीस सरकार सत्तेवर आलं आहे. यानंतर ठाकरे गटातील (Thackeray Group) नेते शिंदे गटातील (Shinde Group) नेत्यांवर तुटून पडले आहेत. शिंदे गटातील नेत्यांकडूनही ठाकरे गटाला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच आता ठाकरे गट शिंदे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. ठाकरे गटाच्या या निर्णयाने रत्नागिरीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
दापोली मंडणगडचे माजी आमदार संजय कदम हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. संजय कदम हे सध्या राष्ट्रवादीत असून लकरच ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कोकणात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. येत्या 15 दिवसांत संजय कदम हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी यासाठी परवानगी दिली असल्याचे म्हटले जात आहे..
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात चार पैकी दोन आमदार हे शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे कोकणात ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे. मात्र आता संजय कदम यांच्या पक्षप्रवेशाने ठाकरे गटाची आघाडीवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दापोली मडंणगड मतदारसंघात चुरस निर्माण होणार आहे. खेडच्या गोळीबार मैदानात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत संजय कदम यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे म्हटले जात आहे.
रामदास कदम यांना तगडं आव्हान?
माजी आमदार संजय कदम यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीने संजय कदम यांना आमदारकीचे तिकीट दिले होते. राष्ट्रवादीच्या तिकीटावर संजय कदम यांनी शिवसेनेची सत्ता असलेल्या दापोली मतदारसंघात विजय मिळवला होता. संजय कदम यांनी सूर्यकांत दळवी यांचा पराभव केला होता. मात्र दुसऱ्याच वेळी रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी संजय कदम यांचा पराभव केला. यामुळे दोघेही एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. अशातच संजय कदम यांना ठाकरे गटात घेऊन उद्धव ठाकरे रामदास कदम यांच्यासमोर तगडं आव्हान निर्माण करण्याच्या तयारीत आहेत.