सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी मुंबईत त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप केला. यावेळी राहुल गांधी यांनी विरोधकांवर आणि पक्ष सोडून गेलेल्यांना फटकारले. राहुल गांधी यांनी यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांचे नाव न घेता त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांपासून वाचण्यासाठी पक्ष सोडल्याचे म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्याआधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही अशोक चव्हाणांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता खासदार अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी यांनी माझ्याबाबत वक्तव्य केले असेल तर ते हास्यास्पद आणि तर्कहीन आहे, अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे. मी कधीही सोनिया गांधी यांना भेटलो नाही, माझे काही म्हणणे मांडले नाही असे अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. अशोक चव्हाण काँग्रेस सोडण्यापूर्वी सोनिया गांधी यांच्या समोर रडले होते, माझ्यात या लोकांसोबत लढण्याची, जेलमध्ये जाण्याची ताकद नाही असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. त्यावर अशोक चव्हाण यांनी हे प्रत्युत्तर दिलं.


"राहुल गांधी यांनी मुंबईच्या सभेत जे विधान केलं त्यात त्यांनी कोणाचे नाव घेतलेलं नाही. जर ते माझ्याबाबतीत बोलत असतील तर ते तर्कहीन आहे. यामध्ये कोणतेही सत्य नाही. मी जोपर्यंत राजीनामा दिला नव्हता तोपर्यंत पक्षाचे काम करत होतो. मी काँग्रेस सोडण्याबाबत कोणालाही माहिती नव्हती. जेव्हा मी विधानसभा अध्यक्षांकडे सदस्यत्वाचा राजीनामा दिला तेव्हाच याबाबत माहिती बाहेर आली," असे अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.


"तोपर्यंत कोणालाच माहिती नव्हतं की काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे. मी सोनिया गांधी यांना भेटलो हे देखील खोटं आहे. मी जाऊन सोनिया गांधी यांना भेटणे, त्यांच्याजवळ भावना व्यक्त करणे यामध्ये कोणतेही तथ्य नाही. मी दिल्लीत सोनिया गांधी यांना भेटलो नाही हे स्पष्ट करतो. कालचं विधान हे निवडणुकीच्या दृष्टीने केलं आहे. यामध्ये कोणतेही सत्य नाही," असेही अशोक चव्हाणांनी म्हटलं आहे.