उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज कोकण दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांच्या स्वागतासाठी संजय राऊत यांचे ठिक ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. पण हे बॅनर चांगलेच चर्चेत आले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गात या बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गटाने थेट आव्हान दिल्याचं बोललं जात आहे. बॅनरवर संजय राऊत यांचा फोटा आणि त्यासोबत 'इलाका तेरा धमाका मेरा' असा इशारा देण्यात आलेली वाक्य लिहिण्यात आली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कणकवलीत पटवर्धन चौकात संजय राऊत यांचं स्वागत केलं जाणार असून याच ठिकाणी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आता नारायण राणे यांच्या इलाक्यात संजय राऊत काय धमाका करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


संजय राऊत यांचा राज्य सरकारवर आरोप
दरम्यान, संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मला तुरुंगात मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे. माणसं संपवण्यासाठीच यांना सत्तेवर आणले आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्याआधी त्यांनी पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येवरुनही राज्य सरकावर ताशेरे ओढले आहेत. पत्रकार वारिसे यांची हत्या थरकाप उडवणारी घटना आहे. ही राजकीय हत्या असून त्यामागे कोणत्या पक्षाचे लागेबांधे आहेत? घटनेवेळी त्या ठिकाणचे सीसीटीव्ही का बंद होते? असे सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केले. 


सिंधुदुर्गात राजकीय हत्यांची परंपरा आहे असं सांगत राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही निशाणा साधला आहे. 


संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट
पहाटेच्या शपथ विधी बाबत संजय राऊत याना माहिती होती आणि त्यांचा हे घडवून आणण्यात मोठा वाटा होता असा खळबळजनक गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी केलाय. इतकंच नाही तर यानंतर ठाकरे कुटुंबीयांनी खास करून वहिनींनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती, असं शिरसाट म्हणालेत.