प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातील ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची हकालपट्टी केली आहे. राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर जाहीरपणे भाष्य केल्यानंतर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर आता पत्रकार परिषद घेत मुरलीधर जाधव यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्षाशी गद्दारी करणारे तुम्हाला चालतात का? असा सवाल ठाकरे गटाचे हातकणंगले लोकसभा मतदार संघातील शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारलाय. हा प्रश्न उपस्थित करत असताना मुरलीधर जाधव यांना अश्रू अनावर झाले. 19 वर्षे पक्षासाठी काम केलं पण त्यांनी मला पदावरून पायउतार केलं. या सगळ्यासाठी सर्वस्वी उद्धव ठाकरे यांना घेरलेले बडवे जबाबदार असून यामध्ये उपनेत्या सुषमा अंधारे, संपर्कप्रमुख अरुण दूधवाडकर, माजी आमदार मिणचेकर यांचा समावेश आहे, असेही मुलरीधार जाधव म्हणाले.


राजू शेट्टी यांच्यासारखा उपरा माणूस हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी देण्यापेक्षा मला सोडून शिवसेनेच्या कट्टर कार्यकर्त्याला उमेदवारी द्या मी जिवाचं रान करतो असं देखील मुरलीधर जाधव यांनी स्पष्ट केल आहे. मुरलीधर जाधव यांनी दोन दिवसापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर कडाडून टीका करत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजू शेट्टी यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुरलीधर जाधव यांना जिल्हाप्रमुख पदावरून पदमुक्त करत दोन नव्या जिल्हाप्रमुखांची नियुक्ती केली आहे.


उद्धव ठाकरेंची परवानगी घेऊन उदय सामंतांना भेटलो


"मी उदय सामंत यांना भेटलो होतो, पण उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊन भेटलो होतो. मी शिंदे गटात गेलो नाही म्हणून माझा एमआयडीसीमधील एक कोटीचा प्लॉट काढून घेण्यात आला. तरीही पक्षाने माझ्यावर अन्याय केला आहे. एमआयडीसीमध्ये कोट्यवधींचा भूखंड घोटाळा झाला आहे. त्यामध्ये माजी आमदार सुजित मिनचेकर यांची टोळी काम करते. सुजित मिणचेकर यांनी सांगितले की, मुरलीधर जाधव यांचा प्लॉट काढून घ्या म्हणजे शिंदे गटात येतील," असे मुरलीधर जाधव म्हणाले.