`दिघेंना पवारांमुळेच जामीन` जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यामुळे नवा वाद... तर नरेश म्हस्केंच्या आरोपाने खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्वत्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्यामुळेच आनंद दिघे यांना खून खटल्यात जामीन मिळाला असं वक्तव्य आव्हाड यांनी केलंय.
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आनंद दिघेंबाबत (Anand Dighe) जितेंद्र आव्हाडांच्या (Jitendra Awhad) एका दाव्यामुळे खळबळ उडालीय. शरद पवार (Sharad Pawar) नसते तर दिघेंना जामीनच झाला नसता असं आव्हाड म्हणाले. खून खटल्यातून दिघे केवळ पवारांमुळेच बाहेर पडले असं आव्हाड म्हणाले. आव्हाडांचे हे दावे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाईंनी (Shambhuraj Desai) फेटाळले आहेत. आव्हाडांचं हे वक्तव्य ठाकरे गटाला (Thackeray Group) मान्य आहे का असा सवाल देसाईंनी केला. आनंद दिघे जामीन मिळवण्यासाठी कधीच शरद पवार यांच्याकडे गेले नसतील, आव्हाड यांचं वक्तव्य म्हणजे आनंद दिघे यांचा अपमान करणारं आहे असं देसाई यांनी म्हटलं आहे.
आनंद दिघे यांच्यावर जेव्हा 'टाडा' कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी आनंद दिघे यांना जामीन मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मदत केली होती. जर शरद पवार यांनी मदत केली नसती, तर आनंद दिघे कधीच 'टाडा'च्या बाहेर आले नसते, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. याआधीही जितेंद्र आव्हाड यांनी एक वक्तव्य केलं होतं.
आनंद दिघेंची जेव्हा सुरक्षा व्यवस्था काढली होती, तेव्हा पद्मसिंह पाटील गृहमंत्री होते. त्यावेळी आनंद दिघेंनी पद्मसिंह पाटलांची भेट घेतली होती. माझी सुरक्षा काढू नका, अशी विनंती आनंद दिघे पद्मसिंह पाटलांना केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आनंद दिघेंना जशी होती तशीच सुरक्षा व्यवस्था परत देण्यात आली होती. याच्यासाठी फार मोठं मन आणि मोठा अनुभव लागतो' असं आव्हाड म्हमाले होते.
शिंदे गटाकडून टीका
जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा शिंदे गटाने (Shinde Group) समाचार घेतला आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबत भान ठेवून वक्तव्य करा असा इशारा नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे. शरद पवारांमुळे जामीन मिळायला शरद पवार न्ययाधीस होते का? शरद पवार न्यायालय चालवत होते का? आनंद दिघे यांनी शरद पवारांनीच जेलमध्ये टाकलं होतं का? या प्रश्नांची उत्तरं जितेंद्र आव्हाड यांनी द्यावीत असं नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.
म्हस्के यांचा खळबळजनक आरोप
मातोश्रीच्या दबावामुळेच आनंद दिघे यांच्या नावाऐवजी नाट्यगृहाला काशिनाथ घाणेकर यांचं नाव दिल्याचा खळबळजनक दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. दिघेंचा पहिला स्मृतिदिन असो की जयंती गडकरी रंगायतनमधले कार्यक्रम आम्हाला रद्द करण्याचे आदेश देण्यात आले होते. आम्ही विनंती केली आम्हाला तरी आमचा कार्यक्रम करु द्या त्यानंतर आम्हाला कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यात आली, असं म्हस्के यांनी सांगितलं.
ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाला धर्मवीर आनंद दिघेंच नाव देण्याचा प्रथम प्रस्ताव आम्ही आग्रहीपणे ठेवला होता. मात्र तो सुद्धा मातोश्री वरून रद्द करण्यात आला त्यानंतर मातोश्री वरुनच घाणेकर नावाचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचा खळबळजनक दावा नरेश म्हस्के यांनी केलाय. कायम दिघेनचा दुस्वास केला त्यांची लोकप्रियता बाळासाहेब गेल्यानंतर मातोश्रीला बघवली गेली नसल्याचाही आरोपही म्हस्के यांनी केलाय.