Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ लक्षवेधी ठरला होता. पवार विरुद्ध पवार  (Pawar vs Pawar) राजकारणाने राज्यसह देशभराचं लक्ष बारामतीतल्या लढतीकडे लागलं होतं. सुप्रीया सुळे आणि उपमुख्यमत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून आमने सामने होत्या. दोन्ही पवारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या लढाईत शरद पवार गटाने बाजी मारली. आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे, पुतणे अजित पवार आणि नातू रोहित पवार तसंच पार्थ पवार सक्रिय राजकारणात आहेत. आता पवार घराण्यातील आणखी एक वारसदार राजकारणात येणार असल्याची चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारामती विधानसभेत अजितदादांचे पूत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे पूत्र जय पवार यांना विधानसभेचं (Vidhansabha Election) तिकिट मिळण्याची शक्यता आहे. बारामती विधानसभेबाबत अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलंय. जय पवारांच्या (Jay Pawar) उमेदवारीबाबत अजित पवारांनी संकेत दिलेत. कार्यकर्त्यांची मागणी असेल तर जय पवारांना संधी देऊ असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. बारामती विधानसभा मी सात-आठ वेळा लढलोय मला इंटरेस्ट नाही असं अजित पवारांनी म्हटलंय. तर याआधी बारामती मतदारसंघात शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांनी (Yugendra Pawar) लढण्याचे संकेत दिलेयत. त्यामुळे बारामतीत जय विरुद्ध युगेंद्र अशी लढत होण्याची शक्यता आहे. 


कोण आहेत जय पवार?
जय पवार हे बारामतीतल्या समाजकारणात सक्रीय आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जय पवार पक्ष कार्यात सहभाग घेतला. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांची धुरा जय पवारांनी सांभाळली होती. लोकसभा निवडणुकीनंतर जय पवार बारामतीत अजित पवार नसताना जनता दरबार घेत होते. जय पवार यांनी आंतरवली सराटी इथं जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली होती.


कोण आहेत युगेंद्र पवार?
युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र पवार यांनी अजितदादांच्या गटात न जाता त्यांनी आजोबांना साथ देण्याची भूमिका घेतली होती. युगेंद्र पवार हे बारामतीत अत्यंत सक्रिय आहेत. बारामती कुस्ती संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी युगेंद्र यांच्याकडे आहे. त्याशिवाय विविध पदावर युगेंद्र काम करत आहेत. तसंच बारामतीतील सामाजिक कार्यक्रमातही युगेंद्र हे सक्रिय असतात. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे ते खजिनदार आहेत.


रोहित पवार यांचा दावा
दरम्यान, 'अजित पवार कर्जत जामखेडमधून उभे राहू शकतात, असा मोठा दावा आमदार रोहित पवार यांनी केलाय. त्यांच्याकडून जे सर्व्हे सुरू आहेत त्यात पर्याय म्हणून पार्थ, जय आणि अजित पवारांचे देखील नाव असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय..  त्यामुळे विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणे पवार विरुद्ध पवार सामना रंगणार का, याकडे लक्ष लागलंय.