उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग : कोकणातलं राजकारण राणेंशिवाय पूर्ण होत नाही असं म्हणतात. ऐन विधानसभेच्या रणधुमाळीत निलेश राणेंनी (Nilesh Rane) राजकीय खेळी करून शिवसेनेचा (Shivsena) धनुष्यबाण हाती घेतला आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ (Kudal Vidhansabha Constituency) इथल्या जाहीर कार्यक्रमात निलेश राणेंनी शिवसेनेत प्रवेश केलाय. विधानसभेच्या जागावाटपात कुडाळ मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटासाठी सोडला जाणार आहे. त्यामुळे निलेश राणेंनी धनुष्यबाण हाती घेतलाय. सिंधुदुर्गातील कुडाळ इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत निलेश राणेंनी शिवसेनेत प्रवेश केलाय. निलेश राणेंना शिवसेनेकडून कुडाळ इथून निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाणार आहे, हे जवळपास निश्चित मानलं जातंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या आक्रमक स्वभाव आणि भाषणशैलीसाठी निलेश राणे ओळखले जातात. शिवसेना शिंदे गटाकडे आमदार वैभव नाईक यांना टक्कर देऊ शकेल असा उमेदवार नव्हता. त्यामुळे निलेश राणे यांना शिवसेनेत घेऊन उमेदवारी देण्याचं नियोजन महायुतीनं केल्याचं बोललं जातंय. तर 2014ला गेलं ते 2024ला परत मिळवणार, असा विश्वास निलेश राणेंनी व्यक्त केलाय.


निलेश राणेंची राजकीय कारकिर्द
आज शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलेल्या निलेश राणे यांच्या कारकीर्दीची सुरुवात काँग्रेसमधून झाली.निलेश राणेना 2009 सालीकाँग्रेस मधून लोकसभा निवडणुक लढविण्याची संधी मिळाली. आणि त्यात ते विजयी झाले. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागंल. राणेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर स्वाभिमान पक्षातून त्यांनी 2019 साली निवडणूक लढविली त्यात ते पराभूत झाले. त्यानंतर आपल्या वडिलांसोबत ते भाजपवासी झाले. भाजपमध्ये त्यांना प्रदेश सरचिटणीस पद देण्यात आले


शिवसेना आणि कोकण ही जुनं राजकीय समीकरण. मात्र एकनाथ शिंदेंच्या फुटीनंतर शिवसेनेची दोन शकलं झाली. पक्षफुटीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाचा पराभव करण्यासाठी राणेंनी कंबर कसली आहे. कुडाळमध्ये वैभव नाईकांविरोधात निलेश राणे, अशी लढत रंगणार हे मात्र नक्की.