अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : भाजपा नेत्या पंकजा मुंडे त्यांच्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी आपल्याला चष्मा लागल्याची माहिती देताना हा व्हिडीओ तयार केला होता. इतरवेळी पक्षातील खदखद सांगणाऱ्या पंकजा मुंडे त्यांच्या या मजेशीर व्हिडीओमुळे चर्चेत आल्या आहेत. सरप्राईज तुमच्या ताईला चष्मा लागला. आता जवळचं स्पष्ट दिसेल, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला होता. अशातच आता पंकजा मुंडेंच्या व्हिडीओवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमरावतीमध्ये बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करण्याची इच्छा पुन्हा महादेव जानकर यांनी वक्त केली आहे. यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांनी जानकर यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. महादेव जानकर यांना गोपीनाथ मुंडे यांनी भाजपशी जोडले. ते मुंडे कुटुंबाचे सदस्य आहेत. त्यामुळे अशा प्रकारची प्रतिक्रिया देणे हे चुकीचे नाही. लोकशाहीमध्ये तेवढा आकडा जोडला की करता येते असे मत चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवले आहे.


यावेळी माध्यमांनी पंकजा मुंडे यांच्या व्हिडीओबाबतही मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारणा केली. याबाबत बोलताना यामुळे पंकजा मुंडे यांचे खूप नुकसान होत आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. "पंकजा मुंडेंचे दुर्दैव आहे की त्या शिंकल्या तरी बातमी होते. पंकजा मुंडे यांच्या प्रत्येक वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जातो. त्यामुळे त्यांचं खूप नुकसान होत आहे. पण हा सर्वसामान्य संवाद आहे," असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.


भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना डोळ्यांचा चष्मा लागला आहे. त्यांनी स्वतःच एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली. ही माहिती देताना त्यांनी 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्याप्रमाणे गाणं म्हटलं. या गाण्याच्या चालीवर ताईला चष्मा लागला, ताईला चष्मा लागला असे पंकजा मुंडे म्हणाल्या. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यासोबत व्हिडीओमध्ये लांबचा नाही बरं, मला जवळचा चष्मा लगला आहे. जवळचं कमी दिसत होतं वाटतं, ते आता स्पष्ट दिसायला लागेल. छोटासा नंबर आहे पण मला स्पष्ट दिसतंय जवळचं. दूरचं तर आधीही चांगलं दिसत होतं आणि आताही अजून चांगलं दिसतंय, असं पंकजा बोलताना दिसत आहेत.