Prakash Ambedkar Letter : लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं की नाही याबाबत अद्यापही महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे. दुसरीकडे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी थेट महाविकास आघाडीच्या कोणत्याही कार्यक्रमांना आणि बैठकींना जाऊ नका असे कार्यकर्त्यांना सांगितले आहे. जागावाटपाचा हा तिढा सुटत नसतानाच वंचितकडून प्रकाश आंबेडकरांनी सभांना सुरुवात केल्याने राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी एक पत्र लिहिलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना आता प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊतांबाबत मोठा खुलासा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येणार की नाही, याबाबत अद्यापही प्रश्नचिन्हच निर्माण झालं आहे. अशातच अद्याप समेट न झाल्याने आम्ही अजूनही महाविकास आघाडीच्या बाहेर असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत. यासोबत प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभा सुरू केल्या आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीशी चर्चा सुरू आहे, ते महाविकास आघाडीत आमच्यासोबत असतील, असं म्हटलं आहे. त्यानंतर  जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकरांना पत्र लिहून महाविकास आघाडीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. 


यावर प्रत्युत्तर देताना आंबेडकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना एक पत्र लिहीलं आहे. या पत्रात प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की, लोकसभा जागावाटपासाठी झालेल्या एका बैठकीत वंचितने ठाकरे गट आणि शरद पवार गटासमोर एक अट ठेवली होती. निवडणुकीनंतर तुम्ही पुन्हा भाजप किंवा आरएसएससोबत समझोता करणार नाही, याची हमी द्या. त्यावेळी मात्र ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी ही मागणी नाकारली होती. त्यामुळे आता या पत्राची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. 


काय म्हटलंय प्रकाश आंबेडकरांनी पत्रात?


आपण लिहिलेले पत्र व्यक्तीगत लिहिले आहे, राष्ट्रवादीचे नेते म्हणून लिहीलेले नाही असे आम्ही समजतो. आम्ही नेहमी मानत आलो आहोत की पक्षाची असो की व्यक्तीगत, राजकारणाची भूमिका एकच असली पाहिजे. आपण या अगोदरही बीजेपीबरोबर समझोत्यामध्ये होता, आजही समझोत्यामध्ये आहात आणि यापुढे राहाल याबद्दल व्यक्तीगतरित्या खात्री आहे. परंतु, आपल्या पक्षाबद्दल ती खात्री देता येत नाही.


त्यामुळे संविधान वाचविणे ही जी आपण व्यक्तीगत जबाबदारी घेतलेली आहे, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. पण आपला पक्ष संविधान वाचविण्यासाठी पुढे येईल का? याबद्दल आमच्या मनात शंका आहे.  आपल्या परीने आम्हाला संविधान वाचविण्यासाठी जे आणि जेवढे करणे शक्य आहे, तेवढे आम्ही संविधान वाचविण्यासाठी करत राहणार आहोत.  त्यामुळे पत्राद्वारे आपण व्यक्तीगत संदेश पाठवला असला तरी त्यातून एक सूर दिसत आहे की, आम्ही संविधान वाचवायला निघालेलो नाही. या पत्राच्या माध्यमातून आम्ही आपल्याला हे सांगत आहोत की,  आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी त्या बैठकीमध्ये उपस्थित होते. त्यावेळी आमच्यातर्फे जेव्हा सांगण्यात आले की, आपल्याला मतदारांना हे आश्वासित करावे लागेल की निवडणुकीनंतर आम्ही बीजेपी किंवा आरएसएसबरोबर समझोता करणार नाही. तेव्हा आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते, ते त्यावर काहीच बोलले नाहीत. ते शांत बसले आणि एका अर्थाने मौनातून त्यांनी विरोध दर्शविला. आपणच फक्त म्हणालात की "लेखी लिहून द्यायला काय हरकत आहे?" ज्या शिवसेनेला आपण सोबत घेतले आहे. त्या शिवसेनेचे प्रतिनिधी संजय राऊत यांनी उघडउघड असे लिहून देण्यास नकार दिलेला आहे. 
 
या सर्व पार्श्वभूमीवर बघितले तर आम्हाला जर आपल्याबरोबर यायचे असेल, तर आम्हाला खात्री करुन घ्यावी लागेल की तुम्ही निवडणूक झाल्यानंतर बीजेपीबरोबर जाणार नाहीत, याची खात्री तुम्हाला द्यावी लागेल आणि ती व्यक्तीगत नाही तर तुमच्या पक्षाला द्यावी लागेल. आपण लिहीलेले हे पत्र सोशल मीडियावर टाकले आहे का हे आम्हाला माहीत नाही. तुम्ही जर हे सोशल मीडियावर दिले नसेल तर आम्ही ही आपल्याला आश्वासित करतो की, आमचे हे पत्र सोशल मीडियावर जाणार नाही. परंतु, आपले पत्र जर सोशल मीडियावर गेले तर आमचे पत्रही सोशल मीडियावर जाईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे.