`लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार आमच्यासोबत येतील`; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
Marathi News Today: राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरु झाली आहे. अशातच शरद पवार हे भाजपसोबत येणार असल्याचे वक्तव्य बड्या नेत्याने केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम : राष्ट्रवादीतल्या (NCP) बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी मोठा भूकंप पहायला मिळाला होता. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही आमदारांसह बंड करत शिंदे फडणवीस सरकारमध्ये मुख्यमंत्री पद मिळवलं होतं. त्यानंतर आता आमच्यापैकी काही जणांनी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजिबात फूट पडलेली नाही, हे स्पष्ट आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटल्याने आता नव्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यापेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे लोकसभा निवडणुकी पूर्वी भाजपसोबत (BJP) येतील असं विधान भाजपच्या बड्या नेत्याने केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही अजित पवार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत या सुप्रिया सुळे यांचे सूचक विधानानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार लोकसभा निवडणुकी पूर्वी भाजपसोबत येतील. माझा विश्वास आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांचे मन परिवर्तन होईल आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील भारत निर्माण करण्यासाठी ते सुद्धा सहकार्य करतील, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत.
जनसंवाद यात्रेनिमित्त वाशिममध्ये आले असताना माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधान केलं आहे. "अजित पवार यांनी जसं स्पष्ट केलं की या देशाला पुढं नेण्याचं कार्य एकमेव मोदीजी करू शकतात ही जर भूमिका सुप्रिया सुळे यांच्याककडे असेल तर राष्ट्रवादी पूर्ण लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत आमच्या सोबत असलील तर आनंदच आहे. शरद पवार यांना आज ना उद्या वाटेलच मोदीजी या देशाला जगातला सर्वोत्तम देश करण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे कालांतराने का होईना मला विश्वास आहे शरद पवार मोदींच्या नेतृत्वातील भारत निर्माण करण्यासाठी मदत करतील. शरद पवार यांना मोदींचा विकास त्यांना कळतो तेही प्रगल्भ नेते आहेत. त्यामुळे इंडिया नाव तयार करून जी मोठ बांधली गेली त्यात काही दम नाही. देशाला स्थेर्य देण्याकरता पंतप्रधान मोदी पाहिजेत. आज ना उद्या मन परिवर्तन होईल," असे वक्तव्य बावनकुळे यांनी केलं आहे.