Imtiyaz Jaleel : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (osmanabad) शहराच्या नामांतरांचा मुद्दा अखेर मार्गी लागला आहे. औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर  (sambhaji nagar) आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण धाराशिव करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यानंतर शुक्रवारी केंद्र सरकारने दोन्ही शहरांचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Davendra Fadanvis) यांनी ट्वीट करत याची माहिती दिली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नामांतरानंतर आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहे. औरंगाबादचे एमआयएमचे (aimim) खासदार इम्तियाज जलील (MP Imtiyaz Jaleel) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या नामांतराला खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवत मी औरंगाबादचाच खासदार असणार आहे असे म्हटले आहे. मुंब्रा येथे एमआयएमच्या राष्ट्रीय मेळाव्यात बोलताना खासदार इम्तियाज जलील यांनी हे विधान केले आहे. दुसरीकडे हे प्रकरण कोर्टात असतानाही केंद्र सरकार निर्णय कसा घेऊ शकते? असा सवालही जलील यांनी विचारला आहे.


"इम्तियाज जलील औरंगाबादचे खासदार होते आणि औरंगाबादचेच खासदार राहतील. काहीजण औरंगाबादचे नामांतर केल्यानंतर उड्या मारत आहेत. पण, माझा जन्म औरंगाबादमध्ये झाला आणि मी औरंगाबादमध्येच मरणार," असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.



"बगीच्यांची नावे बदला, विमानतळाचं नाव बदला, गावाचं नाव बदला, शहरांचं नाव बदला. मात्र या अशा सरकारी निर्णयाला आम्ही आधीपासूनच विरोध केला आहे. तुम्ही इतिहासाची पानं फाडू शकता, तुम्ही एखादा बोर्ड काढून तो बोर्ड बदलू शकता. पण, इतिहास हा इतिहास असतो. औरंगाबाद हे एक ऐतिहासिक शहर आहे आणि वर्ल्ड हेरिटेड मॉन्यूमेंट आपल्या औरंगाबाद शहरातच आहे. स्थानिकांच्या भावना लक्षात न घेताच परस्पर हा निर्णय घेण्यात आलाय. नाव बदलून औरंगाबादचा विकास होणार आहे का? त्यामुळे या नामांतराला आमचा विरोध राहील," असे जलील म्हणाले.