Uddhav Thackeray Group Slams Ajit Pawar Group: "महाराष्ट्र ‘धर्म’ हा मर्दांचा व स्वाभिमान्यांचा आहे. तुंबाजी व मंबाजीसारख्यांचा तो नाही. लढण्याआधीच या लोकांनी शस्त्र ठेवली. जो लढलाच नाही त्याने विजयाचे हाकारे देऊ नयेत. लढून हरणाऱ्यांनाही महाराष्ट्राने डोक्यावर घेतले आहे. मोगलांना आपल्या लेकी, सुना देऊन स्वतःची मुंडकी व पदे वाचवणाऱ्यांची कदर महाराष्ट्राने कधीच केली नाही. मिंध्यांनी हीच मोगल नीती वापरली, पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे मंबाजी, तुंबाजींनी लक्षात ठेवावे," अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटावर निशाणा साधला आहे. अजित पवार गटाचाही समाचार ठाकरे गटाने घेतला आहे.


कात्रीत अजित पवारांचा धर्मनिरपेक्षवादी गट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"आम्ही आमची धर्मनिरपेक्ष भूमिका सोडलेली नाही. शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांची पाठराखण आणि धर्मनिरपेक्षता हा आपल्या पक्षाचा आत्मा असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी (अजित) कमळावर नव्हे, तर घड्याळावर लढणार असल्याचेही अजित पवारांनी जाहीर केले. धर्मनिरपेक्षतेसाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, असा दणकाही पवारांनी उडवला आहे. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये वैचारिक गोंधळाचे चित्र निर्माण झाले आहे ते असे. भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी, त्यांच्याबरोबरचा शिंदे गट हा बोगस हिंदुत्ववादी अशा दोघांच्या कात्रीत अजित पवारांचा धर्मनिरपेक्षवादी गट अडकला आहे," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.


दोन्ही गटांत आताच धुसफूस


"शिंदे गटाने व अजित गटाने कोणत्या चिन्हावर लढायचे हे दिल्लीतील भाजप हायकमांड ठरवणार आहे. मुळात कलंकित चेहऱ्यांना, ‘मिरची’ छाप व्यापाऱ्यांना उमेदवारी देऊ नये, असे फर्मान सुटले तर शिंदे व अजित गटातील 90 टक्के लोक बाद होतील. स्वतः अजित पवार हे कोणत्याच चिन्हावर निवडणूक लढवू शकणार नाहीत. भाजप व त्यांच्या सोबतच्या दोन्ही गटांत आताच धुसफूस सुरू झाली आहे. कलंकित लोकांना उमेदवाऱ्या मिळू नयेत व मिळाल्याच तर आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, अशी भाजपच्या प्रमुख मंडळींची भूमिका आहे असे वृत्त संघ परिवारानेच सोडले आहे. प्रश्न राहिला चिन्हाचा. ‘धनुष्यबाण’ हे पवित्र चिन्ह निवडणूक आयोगाने फुटीर गटास दिले व त्याबाबतचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. राष्ट्रवादीबाबतचा चिन्हाचा निकाल लागायचा आहे, पण पक्ष फोडताना सध्याचे दिल्लीश्वर फुटीर नेत्यांच्या हाती मूळ पक्षाचे चिन्ह बिदागी म्हणून ठेवतात. त्यामुळे घड्याळावर किंवा धनुष्यबाणावर लढणार असे हे लोक सांगतात. घड्याळावर लढा किंवा धनुष्यबाणावर लढा, जनता फुटिरांना समर्थन देणार नाही हे महाराष्ट्राचे जनमानस आहे," असा दावा ठाकरे गटाने केला आहे.


जो न्याय केदारांना तोच न्याय या घोटाळेबाजांना का नाही?


"अजित पवार, मिंधे गट वगैरेंनी कोणत्या चिन्हावर लढायचे व पडायचे हा त्यांचा प्रश्न; पण जनता मोदींनाच निवडून देईल या भ्रमाचाही भोपळा फुटल्याशिवाय राहणार नाही. अजित पवार हे निवडणुकीत उभे राहतील व त्यांच्या प्रचारास पंतप्रधान मोदी येतील हे चित्र महाराष्ट्राला डोळे भरून पाहायचेच आहे. प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ अशांच्या प्रचारांचा नारळ गृहमंत्री अमित शहा फोडतील तेव्हा होणारी सत्त्वशील भाजपवाल्यांच्या मनाची अवस्था मराठी जनांस समजून घ्यायची आहे. काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना नागपूर जिल्हा बँकेतील 152 कोटींच्या गैरव्यवहाराचे प्रकरण भोवले व न्यायालयाने दोषी ठरवून पाच वर्षांची सजा सुनावली. मग कमळाबाईशी ‘निकाह’ लावलेल्या मंडळींचा सिंचन घोटाळा, शिखर बँक घोटाळा, मिरची घोटाळा, कोल्हापूर बँक घोटाळा, भीमा पाटस सहकारी कारखाना घोटाळा, गिरणा मोसम सहकारी साखर कारखाना घोटाळा, आरोग्य सेवा घोटाळा वगैरेंतील मुख्य आरोपींवर हा असाच शिक्षेचा बडगा कधी बसणार? जो न्याय केदारांना तोच न्याय या घोटाळेबाजांना का नाही? अर्थात आज ते बचावले असले तरी 2024 साली त्यांचा न्याय होईल," असा उल्लेख अग्रलेखात आहे.


प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष संपवायचे


"मिंधे व फजित गटातील बहुतेक लोकांवर घोटाळ्यांचे आरोप आहेत. अटकेच्या भयाने ते कमळाबाईच्या आश्रयाला गेले. त्यांचे ते धर्मनिरपेक्षता, पुरोगामित्व, समाजसुधारकांचा वारसा वगैरे सगळे दावे झूठ आहेत. अजित पवार सांगतात, जनता मोदींनाच निवडून देईल. मोदी व्यक्तिगतरीत्या निवडून येतील, पण त्यांचा पक्ष पराभूत होईल. एकवेळ मोदी जिंकतील, पण महाराष्ट्रातील दोन्ही गटांचे बेइमान लोक सपशेल पराभूत होतील. त्यामुळे मोदी यांच्या विजयाचा बँडबाजा इतर कोणी वाजवायची गरज नाही व महाराष्ट्रातील फुटीर गटांमुळे भाजपच्या अंगावरील मांस तोळाभर वाढले अशा भ्रमात या मंडळींनी राहू नये. सध्याच्या दिल्लीश्वरांना महाराष्ट्राचे महत्त्व खतम करायचे आहे. स्वाभिमान पायदळी तुडवायचा आहे. मुंबईचा सौदा करायचा आहे. म्हणून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष त्यांना संपवायचे आहेत," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.


लोकांच्या मनात संभ्रम नाही


"पवार यांच्या कुटुंबात काय चालले आहे, कोण एकत्र येतायेत व कोण वेगळ्या पाटावर बसताहेत हा त्यांचा प्रश्न. त्यांचे कुटुंब त्यांची जबाबदारी, पण लोकांच्या मनात अजिबात संभ्रम नाही. लोकांना राज्यातील ढोंगी व डरपोक गवत कायमचेच उपटून टाकायचे आहे," असं ठाकरे गटाने म्हटलंय.