Maharashtra Politics : केंद्रीय निवडणूक आयोगाने  (Election Commission) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांचा शिंदे गटच (Shinde Group) शिवसेना (Shivsena) असल्याचा निर्णय दिल्यानंतर उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे. त्यानंतर आता निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेचे विधानसभा पक्ष कार्यालय शिंदे गटाला मिळाले आहे. यानंतर आता ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी शिंदे गटाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या 56 आमदारांना व्हीप (Veep) बजावला आहे. व्हीप पाळला नाही तर ठाकरे गटाच्या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. याबाबत आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थसंकल्पामध्ये ठाकरे गटाकडून शिंदे गटाचा जोरदार विरोध दर्शवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाने ठाकरे गटाच्या आमदांसह सर्व आमदारांना व्हीप बजावला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार हा व्हीप पाळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवसेनेचे प्रतोद भारत गोगावले यांनी व्हीप जारी केला आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप पाळावा लागणार असल्याचं संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे. तर व्हिप झुगारल्यास निलंबन होणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यावर बैठकीनंतर निर्णय होणार असून याबाबत आमचे खासदार ठरवतील, असंही भारत गोगावले म्हणाले. 


उद्धव ठाकरे काय म्हणाले?


"आमदार अजिबात अपात्र होऊ शकत नाही. कारण दोन गटांना मान्यता दिल्यानंतर दोन्ही गट आहेत हे मान्य केले आहे आणि दोन्ही गटांना नाव आणि चिन्ह देण्यात आले आहे.  निवडणूक आयोगाने त्या गटाला नाव आणि चिन्ह दिलं. त्यामुळे आमच्या गटाचा आणि त्या गटाचा संबंध नाही," असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.