Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची चौकशी सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी तपास पथक त्यांच्या घरी पोहचले होते. अशातच उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर असून ते सध्या राजापूरमध्ये आहेत. यावेळी उद्धव ठाकरे आमदार राजन साळवी यांच्या घरी भेट देणार आहेत. त्याआधी उद्धव ठाकरेंनी राजापूर येथे सभा घेऊन राजन साळवींवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथे राजनची पाठ थोपटायला आलोय. संकटाच्या काळात कोण पाठी उभं राहतं ते कळतं, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साळवी यांच्या घरातील संपत्तीची किंमत केलेली यादी वाचून दाखवली. "या यादीवर सुशांच चव्हाण नावाच्या व्यक्तीची सही आहे. सावंत मराठी वाटतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत पाच हजार लावली. बाळासाहेब ठाकरे फोटो आणि खुर्ची दहा हजार रुपये. तुमच्या सात पिढ्या आल्या तरी त्याची किंमत करता येणार नाही. तुमच्या आई वडिलांची किंमत केली तर? तुमची किंमत किती? मिंध्याना त्यांच्या वडिलांची किंमत कळाली नाही म्हणून माझा बाप चोरताहेत, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.


"मी यंत्रणेतल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतोय दिवस बदलत असतात. दुर्दैवाने आज त्यांचे दिवस आहेत. पण त्यांचे दिवस फिरले तर तुमचेही दिवस फिरतील हे लक्षात ठेवा. त्यांचे दिवस फिरले तर तुमचे दिवस आणखी वाकडे होतील. सरकार येत आणि जाते. राज्यात अनेक मुख्यमंत्री झाले. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन येत नाही. लांडग्यासारखी तुम्ही कोणाची लाचारी करणार असाल तर सत्ता बदलल्यानंतर तुमची लांडगेगिरी सरळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही," असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.


"राजन साळवींची काय प्रॉपर्टी सापडली आहे. त्यांची प्रॉपर्टी सापडली असेल तर राजापूरमध्ये जे इच्छुक उमेदवार म्हणून खर्च करत आहेत त्यांच्या घरी आधी धाड टाका. त्यांच्या भावाच्या संपत्तीची चौकशी करा. गणपत गायकवाड यांनी आरोप केला मिंध्यांकडे त्यांचे करोडो रुपये आहेत. गणपत गायकवाड काय बोलले याची दखल का नाही घेत? सत्ताधारी आमदाराला काही किंमत नाही? आमदारांना पिस्तुल घ्यावं लागत आहे. गणपत गायकवाडांना काय भोगावं लागलं हे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.


"या सगळ्यामध्ये गृहमंत्री कुठे आहेत? देवेंद्र फडणवीस दिसलेत का कुठे? बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली की अशा हजारो घटना घडतात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे की, तुमच्या पक्षाचा आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करतो, तो ज्याच्यावर आरोप करतो तो गद्दार तुम्ही डोक्यावर बसवलाय," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.