`...तेव्हा मी कोणाच्या बापाचे ऐकणार नाही`; लोकसभा निवडणुकीवरुन अजित पवारांचा इशारा
Ajit Pawar : खरंच त्यांची शेवटची निवडणूक असेल का मला माहीत नाही, असे अजित पवार यांनी शरद पवार यांना टोला लगावल्याची चर्चा आहे. अजित पवार बारामती कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी बारामती लोकसभेसाठी मी उमेदवार आहे असे समजून मतदान करा असे म्हटलं.
Maharashtra Politics : आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट बारामती, शिरूर, सातारा, रायगड या चार जागा लढवणार आहे. त्यामुळे अजित पवार गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. या सगळ्यात बारामतीच्या लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण हा मतदारसंघ गेल्या कित्येक वर्षांपासून खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे. आता सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीसाठी उभ्या राहणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच बारामतीमध्ये मीच उभा आहे असे समजून मतदान करा अशी विनंती अजित पवारांनी केली आहे. यासोबत शेवटी धाडस दाखवल्यानंतरच कामे होतात असे सूचक विधान देखील अजित पवार यांनी केले आहे.
बारामतीत विविध विकास कामांची पाहणी केल्यानंतर एका कार्यक्रमात बोलत असताना अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "विधानसभेची निवडणूक लोकसभा झाल्यानंतर आहे. लोकसभेला मीच उमेदवार आहे असे समजून तुम्ही मतदान करा अशी विनंती आहे. मी केलेल्या कामाची जर तुम्हाला पावती द्यायची असेल तर तुम्ही मी दिलेल्या उमेदवाराच्या मागे भक्कम उभे रहा. बारामती कशा पद्धतीने विकास कामे झाले आहेत हे तुम्हाला माहिती आहे. शेवटी धाडस दाखवल्यानंतरच कामे होत असतात," असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.
"आता निवडणूक जवळ आली आहे. काही जण तुमच्याकडे येतील. माझी ही शेवटची निवडणूक असल्याचं म्हणतील. त्यांची ही त्यांची अखेरची निवडणूक खरंच असेल का ते मला माहीत नाही. पण तुम्ही भावनिक होऊन जाऊ नका. ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. तुम्ही मला निवडणुकीत योग्य पद्धतीनं सहकार्य केलं तर पुढची कामं होतील. नाही तर मी पुढच्या कामांना बांधील नाही," अशी अजित पवारांनी नाव न घेता शरद पवारांवर टीका केल्याची चर्चा आहे.
50 खोके घोषणांमुळे एकनाथ शिंदे वैतागले
"एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. अडीच वर्षे उद्धव ठाकरेंसोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी काम करण्याची मुभा दिली. पण त्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या वरिष्ठांचा काय निर्णय झाला हे मला माहिती नाही. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर सातत्याने वेगवेगळे शब्द वापरुन त्यांना अक्षरशः नको नको केलं होतं. सतत 50 खोके एकदम ओके अशा घोषणांनी वैतागून गेले होते. आपण भूमिका घेतल्यानंतर एक अक्षराने कुणी आरोप केला नाही. सगळे ती भूमिका घेणार होते. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे सुरुवातीपासून राष्ट्रवादीसोबत आहेत," असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मी सत्येत असल्याने बारामती कामे होतात - अजित पवार
"लोकसभेला विधानसभेला दोन डगरीवर चालणार नाही. लोकसभेला पण माझ्या उमेदवाराला मत द्या आणि विधानसभेला पण मला मते द्या. हा विकासाचा रथ आणखी जोमाने पुढे जाईल. 22 जानेवारीचा रामलल्लांचा सोहळा संपूर्ण जगाने पाहिला व देशभर हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यातील इतरही देवस्थानला चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहोत. आज बारामतीतील विकास कामे का होतात तर ते मी सत्येत आहे म्हणून होत आहेत. तसेच लोकसभेलाही आपल्या विचाराचा बारामतीचा उमेदवार दिला तरच विकास होईल. बारामती लोकसभेला जर मला मिठाचा खडा लागला तर मी आमदारकीला वेगळा विचार करेन. त्यावेळेस मी कोणाच्या बापाचे ऐकणार नाही. पाच वर्षे मी तुम्हाला बिनचूक आणि चोख काम करून दाखवले आहे. माझा दावा आहे की माझे काम कोणताच मायका लाल करू शकत नाही," असेही अजित पवार म्हणाले.