`मी सत्तेत असताना काय केलं जगाला माहिती`; शरद पवारांचे अमित शाहांना प्रत्युत्तर
Sharad Pawar : अहमदनगरमध्ये बोलताना शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. 10 वर्ष तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्ही काय केलं याचं उत्तर देण्याची जबाबदारी तुमची आहे असा सवाल शरद पवारांनी विचारला आहे.
Sharad Pawar on Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नांदेडमधल्या सभेतून शरद पवारांवर निशाणा साधला होता. 10 तुम्ही सोनिया गांधी सरकारमध्ये कर्तेधर्ते होतात. 10 वर्षात तुम्ही महाराष्ट्राला काय दिलं, असा सवाल अमित शाह यांनी शरद पवारांना विचारला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी 10 वर्षात तुम्ही काय केलं सांगा असं म्हटलं आहे. अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली.
"अमित शाह 2014 ते 2024 शरद पवारांनी काय केलं विचारतात. त्यांना एवढंच सांगू इच्छितो गेल्या 10 वर्षात मी सत्तेवर नव्हतो तर ते सत्तेवर होते. त्यामुळे सत्तेचा अधिकार त्यांच्या हातात होता. या 10 वर्षात त्यांनी काय केलं हे सांगायची जबाबदारी त्यांची आहे. जे सत्तेत नव्हते त्यांची ही जबाबदारी नाही. त्याच्याआधी मी सत्तेत होतो त्यावेळी माझ्याकडे शेतीचे काम होते आणि त्यासंदर्भात काय केलं गेलं हे सगळ्या जगाला माहिती आहे," असं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिलं आहे.
राधाकृष्ण विखे पाटालांवरही टीकास्त्र
शरद पवारांनी जिल्ह्यामध्ये भांडणे लावली असे विखे पाटील यांनी म्हटल्याचे पत्रकारांनी म्हटलं. त्यावर प्रत्युत्तर देताना शरद पवारांनी विखे पाटलांवर निशाणा साधला. "ज्यांचे नाव तुम्ही घेतलं त्यांच्याबद्दल भाष्य करावं असं मला वाटत नाही. ज्या लोकांमध्ये सातत्य नाही. कधी शिवसेना, कधी काँग्रेस तर कधी भाजपमध्ये. त्यांचा पराक्रम सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे," असे शरद पवार म्हणाले.
"2019 मध्ये आमचे चार खासदार होते. पण आमचे लक्ष लोकसभा नाही तर विधानसभा आहे. लोकसभेसाठी कमी जागा घेऊन विधानसभेला अधिक जागा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमार्फत जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे लोकसभेत आम्ही कमी जागा घेतल्याचे शरद पवार म्हणाले. 50 टक्केपक्षा जास्त जागांवर महविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील," असाही विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
यासोबत अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधी संदर्भात केलेल्या दाव्यावरूनही शरद पवार यांनी भाष्य केलं. भाजपसाोबत जाण्यासाठी आमची कधीच सहमती नव्हती आणि यापुढेही राहणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.