महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारे श्याम मानव नेमके आहेत तरी कोण?
Who is shyam manav : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे श्याम मानव कोण आहेत? जाणून घ्या संपूर्ण प्रवास
Shyam Manav : सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांमुळे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत श्याम मानव यांनी खळबळजनक खुलासा केला. अनिल देशमुखांवर इतका दबाव होता, कुटुंबाचा प्रश्न होता, त्यांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न होता. त्यांनी कुठल्याही प्रतिज्ञापत्रावर सही केली नाही. तरी देखील त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. अनिल देसाई आत्महत्या करण्याच्या विचारात होते, असा खळबळजनक दावा मानव यांनी केला. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील गंभीर आरोप केला आहे. मात्र, राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारे श्याम मानव आहेत तरी कोण? जाणून घ्या सविस्तर
कोण आहेत श्याम मानव?
श्याम मानव यांचा जन्म 9 सप्टेंबर 1951 रोजी वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे झाला होता. विनोबा भावे यांच्या चळवळीत सहायक म्हणून वडील ज्ञानदेव काम करत होते, त्यामुळे सामाजिक कार्याचा प्रभाव त्यांच्यावर होता. गांधीवादी विचारांवर श्याम मानव प्रभावित झाले. पुढे त्यांनी इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी मिळवली अन् नेर येथे इंग्रजी शिकवण्यास सुरूवात केली. कॉलेजमध्ये असताना आणीबाणीचा काळ सुरू होता. त्यावेळी जयप्रकाश नारायण यांच्या भाषणाने श्याम मानव प्रेरित झाले. त्यावेळी ते छात्र युवा संघर्ष वाहिनीसोबत जोडले गेले.
सरकारविरोधात भूमिका मांडल्याने 1975 च्या आणीबाणीच्या काळआत त्यांना तब्बल 9 महिने तुरूंगात देखील जावं लागलं. त्यानंतर त्यांनी लेखनाकडे लक्ष केंद्रित केलं. लोकमत, नागपूर पत्रिका, तरुण भारत या प्रकाशनामध्ये त्यांनी लिखान सुरू केलं. याच काळात त्यांनी अंधश्रद्धेविरोधी लढा देखील सुरू केला. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पाया रचण्यात श्याम मानव यांचा मोठा वाटा होता. देव आणि धर्माच्या नावावर लुटणाऱ्या लोकांना आमचा विरोध आहे, अशी भूमिका त्यांनी वारंवार स्पष्ट केली आहे.
श्याम मानव यांनी 1983 मध्ये जेव्हा भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली तेव्हापासून त्यांनी नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत काम करण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर 1989 मध्ये नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत झालेल्या मतभेदानंतर नरेंद्र दाभोळकर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. याकाळात अंधश्रद्धाविरुद्ध महाराष्ट्रात दुधारी तलवारी चालत होत्या. समिती जरी दोन वेगवेगळ्या असल्या तरी ध्येय मात्र एकच होतं.
जादूटोणा विरोधी कायद्यासाठी श्याम मानव आणि नरेंद्र दाभोळकर यांनी मोठं योगदान दिलं. गेली 40 वर्ष श्याम मानव अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करत आहेत. काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये धीरेंद्र शास्त्री बाबा म्हणजेच बागेश्वर धाम महाराज यांच्याविरुद्ध श्याम मानव यांनी आवाज उठवला होता. त्यावेळी त्यांनी बागेश्वर बाबाला खुलं आव्हान दिलं होतं. त्यानंतर श्याम मानव चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते.
दरम्यान, आदित्य, उद्धव ठाकरेंवर खोटे आरोप करण्यासाठी फडणवीसांचा दबाव होता. 3 वर्षांपूर्वी फडणवीसांनी एक माणूस पाठवून अॅफिडेव्हीट पाठवले होते, असा आरोप श्याम मानव यांनी केला आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.