मुंबई, नवी मुंबईत पावसाच्या तुरळक सरी; विदर्भाला यलो अलर्ट, कोकणात मात्र चकवा
Maharashtra Weather Updates: राज्यातून मोठ्या सुट्टीवर गेलेल्या पावसानं आता पुन्हा एकदा धीम्या गतीनं का असेना पुनरागमनास सुरुवात केली आहे. पाहा हवामान विभागाकडून मिळालेली माहिती
Maharashtra Weather Updates: पावसाळी सहलींचे बेत आखणाऱ्या अनेकांचाच या पावसानं हिरमोड केला. जुलै महिन्याच्या शेवटी हा मोसमी पाऊस जो सुट्टीवर गेला तो ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातही परतला नाही. पण, आता मात्र हे चित्र बदलणार आहेय कारण, तब्बल 15 दिवसांच्या मोठ्या सुट्टीनंतर पाऊस पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. सध्याच्या गतीला पाऊस धीम्या गतीनं राज्याच्या काही भागांमध्ये सक्रिय होत असून, सध्या तो विदर्भात परतल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
विदर्भात परतलेला हा पाऊस चांगल्या मुक्कामासाठी आला असून, 20 ऑगस्ट आणि त्यानंतरचेही काही दिवस तो या भागात तूफान बरसणार असल्याचा इशारा दिला आहे.
पावसाच्या धर्तीवर पुढील 24 तासांसाठी विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. 20 ऑगस्टपर्यंत पावसाचा हा इशारा लागू असेल. दरम्यान गुरुवारी मध्यरात्रीपासून नागपुरात पाऊस सुरू झाल्यामुळं आता आठवड्याचा शेवट इथं पाऊसच करणार हे स्पष्ट होता दिसत आहे.
हवामानाची एकंदर स्थिती
मागील 15 दिवसांच्या विरामानंतर आता बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पाऊस पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. यामध्ये विदर्भातील पुर्वेकडे असणाऱ्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवारीही विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता आहे. तर, 20 ऑगस्टला पश्चिम विदर्भात जिल्ह्यात पाऊस होणार आहे
जुलै महिन्यात पाऊस सरासरीहून काही प्रमाणात जास्त झाला. पण, त्यानंतर मात्र ऑगस्टमधील विश्रांतीमुळं सरासरी पावसात 12 टक्क्यांची घट झाली. परिणामी आता हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार हा पाऊस नेमका ही घट भरून काढेल का हाच प्रश्न उपस्थित होत आहे.
हेसुद्धा वाचा : गणपती बाप्पाsss! कोकणच्या वाटेनं जाणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून 'या' मार्गावर 550 विशेष बस
दरम्यान पुढील 24 तासांमध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर भागांमध्ये हवामान बहुतांशी ढगाळ असेल. तर, कोकणातही पाऊस काही भागांमध्ये चकवा देताना दिसेल. थोडक्यात पाऊस परतला असता तरीही त्याची विदर्भावरच कृपा आहे असं म्हणायला हरकत नाही.
देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये हाहाकार
हिमाचल आणि उत्तराखंडसारख्या राज्यांमध्ये पावसानं मागील काही दिवासांत मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्तहानी केली आहे. संपूर्ण देशाचं हवामान पाहायचं झाल्यास शनिवारी पूर्व भारत आणि रविवार सोमवारी पूर्वोत्तर भारतामध्ये पावसाची हजेरी असेल. दक्षिण भारतामध्येही मेघगर्जनेसह पावसाची हजेरी पाहायला मिळेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.