Maharashtra Rain : चांद्रयान चंद्रापर्यंत पोहोचलं तरी पावसाचा थांगपत्ता नाही; हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं की...
Maharashtra Rain : दडी मारून बसलेला पाऊस आज येईल, उद्या येईल, पुढच्या आठवड्याच येईल असा अंदाज हवामान विभाग वर्तवत राहिला. पण, हा पाऊस मात्र सतत हुलकावणी देताना दिसला.
Maharashtra Rain : महाराष्ट्रातील पावसानं काही केल्या माघारी फिरण्याचं नाव घेतलं नाहीये त्यामुळं आता शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही चिंता सतावू लागली आहे. पावसाअभावी शेतीची कामं ताटकळली आहेत. तर, शहरी भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा असला तरीही पावसाची सद्यस्थिती पाहता पालिका प्रशासनांन पाणीकपात सध्यातरी रद्द न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं इथंही चिंतेचीच लाट. राज्यात एकंदर अशीच परिस्थिती असल्यामुळं आता पाऊस नेमका कधी परतणार असाच प्रश्न सर्वांना पडतोय. 'आतातर हे चांद्रयान चंद्रावर पोहोचेल पण, पाऊस काही महाराष्ट्रात परतण्याच्या मनस्थितीत दिसत नाही', अशाही मिश्किल प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.
राज्यावर मान्सूनची कमजोर पकड
महाराष्ट्रात सध्या पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होत असली तरीही मान्सूनची पकड मात्र कमकुवत झालेली दिसत आहे. विदर्भात मध्यम स्वरुपाता पाऊस बरसतोय, तर कोकणात मात्र तुरळक सरीच सुरु आहेत. येत्या 24 तासांमध्येही हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
येत्या काही दिवसांमध्ये मुंबई, नवी मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रामध्ये ऊन- पावसाचा खेळ पाहायला मिळेल. तर, पुणे- सातारा आणि कोल्हापुरात घाटमाथ्यावर बहुतांशी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. राज्यात पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्या तरीही पावसाचं हे प्रमाण दिलासा देणारं नसेल असंच हवामान विभागानं सांगितलं आहे.
हेसुद्धा वाचा : Chandrayaan 3 LIVE: 5...4...3...2...1 चांद्रयान 3 चंद्रावर उतरण्याच्या तयारीत; देशभरात उत्साह
दरम्यान, राज्यात पावसाचं प्रमाण बेताचं असल्यामुळं सध्यातरी कोणत्याही जिल्ह्यासाठी ऑरेंज किंवा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. असं असलं तरीही भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती येथे मात्र काहीसा दिलासादायक पाऊस होणार आहे. इथं साधारण 65 मिमी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
भरतीच्या वेळा आणि किनारपट्टी भागासाठीचा इशारा
मान्सूनचे वारे सध्या किनारपट्टी भागावर फारसा प्रभाव पाडणार नाहीयेत. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील किनारपट्टी भागांमध्ये दुपारी 3 वाजून 32 मिनिटांनी भरतीचा इशारा देण्यात आला असून, इथं या काळात 3 मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा दिला गेला आहे.