Maharashtra Rain : नागपूरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; राज्यात पुढील 48 तास पावसाचे, हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Rain : ऐन मोसमात दडी मारून बसलेला पाऊस आता परतीच्याच वेळेला जोर धरताना दिसत आहे. थोडक्यात पाऊस आता मोठ्या मुक्कामी आल्याचच स्पष्ट होत आहे.
Maharashtra Rain : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुसळधार बरसणाऱ्या पावसानं पुन्हा एकदा जोर धरला असून, आता कोकण, विदर्भासह राज्यातील बहुतांश भागात तो बरसताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासांत राज्यात पाऊस सक्रिय राहणार आहे. ज्यामुळं रायगड, भंडारा, गोंदिया, नागपूरात पावसाच्या तुरळक ते मुसळधार सरींची वर्तवली जात आहे. राज्यातल्या इतर भागांतही मेघगर्जेनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. 25 आणि 26 सप्टेंबरला राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
मागील काही तासांचा आढावा घ्यायचा झाल्यास...
गेल्या 24 तासांमध्ये मुंबईच्या काही भागांसह पुण्यात जोरदार पाऊस बरसला. सिहंगड रोड आणि मधवर्ती भागासह उपनगरात मुसळधार पाऊस पडल्यामुळं अनेक भागांत पाणी साचलं.
तिथे भंडारा जिल्ह्यालाही शुक्रवारी सकाळपासून पावसानं झोडपून काढलं. तुमसर शहरात तर पावसानं कहर केल्यामुळं शहरात पूरस्थिती निर्माण झाली. भरीस भर म्हणजे तुमसर भंडारा मार्गावर दोन फूटापर्यंत पाणी वाहत असल्यानं, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली.
नागपुरात मध्यरात्री पावसानं हाहाकार माजवला
शुक्रवारी मध्यरात्री नागपुरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. अचानक सुरू झालेल्या या मुसळधार पावसानं शहरात कहर केला. नागपुरात कधी नव्हे इतका पाऊस झाल्यामुळं अनेक भागात पावसाचं पाणी घरांमध्ये शिरलं तर अनेक वाहनांचंही नुकसान झाल्याची बाब समोर आली.
गोदावरी काठच्या गावांना इशारा..
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरु असणाऱ्या पावसामुळे निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी दाखल होत असल्याने पाणीसाठ्यामध्ये वाढ होत असून नांदूर मधमेश्वर धरणाच्या 5 वक्रार गेट द्वारे 16,655 क्यूसेक पाण्याचा विसर्ग मराठवाड्यातील जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदीत सुरू करण्यात आला आहे. दारणा, गंगापूर धरणातून विसर्ग वाढल्यास नांदूर मधमेश्वर धरणातून विसर्गात वाढ करण्यात येईल त्यामुळे गोदावरी नदी काठच्या गावातील नागरिकांनी नदी काठी जाऊ नये असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे .
मान्सूनच्या परतीचा प्रवास...
इथं मान्सनून जोर धरताना दिसत असला तरीही त्याचा परतीचा दिवस आता दूर नाही ही बाबसुद्धा नाकारता येत नाही. वायव्य भारतातून पावसाचा परतीचा प्रवास सोमवार, 25 सप्टेंबरपासून सुरू होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सहसा मोसमी पाऊस 17 सप्टेंबरच्या सुमारास वायव्य भारतातून माघार घेतो. तर, 15 ऑक्टोबपर्यंत तो देशातून पूर्णपणे माघार घेतो. यंदा मात्र हा प्रवास काहीसा उशिरानं सुरु होईल.
अल निनोचा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांतील पावसावर विपरीत परिणाम झाल्याचं स्पष्ट मत हवामान विभागानं वर्तवलं आहे. जून- जुलै महिन्यात देशात पाऊस सक्रियच झाला नाही. पण, जुलैच्या अखेरीस देशभरात बंगालच्या उपसागरात सतत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पावसाने सरासरी भरून काढल्याचं पाहायला मिळालं होतं.