Maharashtra Rain : गणरायाच्या स्वागतासाठी पावसाची हजेरी; मुंबई, कोकणात मुसळधार
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आणि हा पाऊस अवघ्या महिन्याभरातच माघारी फिरला. पण आता मात्र गणेशोत्सवासाठी पावसाचीही हजेरी पाहायला मिळत आहे.
Maharashtra Rain : गणेशोत्सवाला राज्यात अतिशय उत्साहात सुरुवात झालेली असतानाच आता पावसानंही गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. जिथं अनेकजण आपआपल्या घरांतून लाडक्या बाप्पाला आणायला निघाले आहेत तिथं या मंडळींना वरुणराजाही साथ देताना दिसत आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार दिवस पावसाचं हेच चित्र पाहायला मिळणार असून, रायगडसह संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये पाऊस मनमुराज बरसताना दिसणार आहे. त्यामुळं गणेशोत्सवात फिरण्याचे किंवा आप्तेष्ठांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला जायचे बेत आखत असाल तर पर्जन्यमानाचा अंदाज नक्की घ्या.
मंगळवारी सकाळपासूनच मुंबई, नवी मुंबई आणि रायगड पट्ट्यामध्ये पावसानं दमदार सुरुवात केली. साधारण तासाभराच्या पावसानं आपण मोठ्या मुक्कामासाठीच आलो आहोत असंच जणू सर्वांच्या लक्षात आणून दिलं. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार पुढच्या 24 तासांमध्ये राज्यातील 5 जिल्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही भागांमध्ये सकाळच्या वेळी मात्र हवेतील आर्द्रता वाढून उकाडा जाणवणार आहे. बहुतांश भागांवर काळ्या ढगांची चादर असेल.
हेसुद्धा वाचा : दक्षिण भारतातील Hoysala मंदिरांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; थक्क करणारी शिल्पकला
मुंबई, पुणे, पालगर, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, राज्याच्या इतर भागांमध्ये मात्र पाऊस काहीशी विश्रांती घेताना दिसेल. सध्या मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्याचे थेट परिणाम कोकणात पाहायला मिळत आहेत. ज्यामुळं कोकणातील घाटमाथ्यावरील भागामध्येही पावसाची दमदार हजेरी असणार आहे, तर तिथं सातारा आणि कोल्हापुरातील घाटमाध्यावरही अशीच परिस्थिती असेल.
परतीच्या पावसाचा मुहूर्तही लांबला...
हवामान विभागाच्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी पावसाची सुरुवात काहीशी उशिरा झाल्यामुळं त्याच्या परतीचा मुहूर्तही लांबणीवर पडला आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पुढच्या पाच दिवसांसाठी मुक्कामी असणारा पाऊस आतता थेट दसऱ्यानंतर माघारी फिरणार आहे असंच चित्र सध्या पाहायला मिळत आहे. परिणामी राज्यातून पावसाच्या परतीची प्रक्रिया 14 ते 15 ऑक्टोबरनंतर सुरु होऊ शकतो. त्याच्या या प्रवासाला साधारण ऑक्टोबर अखेरीसच वेग येण्याची चिन्हं आहेत. त्यामुळं हा पाऊस इतक्यात पाठ सोडणार नसून या न त्या कारणानं तो आपल्यावर धडकणार आहे हेच खरं.