Maharashtra Rain : महाराष्ट्रात मान्सूनचे सुरुवातीचे काही महिने चकवा देणाऱ्या पावसानं ऑगस्टच्या अखेरीस जो जोर धरला तो अजूनपर्यंत कमीजास्त प्रमाणात टिकून आहे. सप्टेंबरची सुरुवातही पावसानं दणक्याच केली आणि आता हा महिना संपण्याच्या दिशेनं वाटचाल करत असतानाही पावसानं काही पाठ सोडलेली नाही हेच आता पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील काही दिवसांसाठी राज्याच्या काही भागात पावसाचा जोर ओसरणार असला तरीही काही भागांमध्ये मात्र मुसळधार बरसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सिक्कीमपासून महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं गेल्या काही तासांमध्येसुद्धा पावसानं राज्यात चांगली हजेरी लावली. ही एकंदर परिस्थिती आणि वाऱ्यांची रचना पाहता बुधवारपर्यंत हवामान विभागाकडून सबंध महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. ज्यामुळं विदर्भासह कोकणातील काही भागात पावसाचा जोर जास्त राहील. पण, उर्वरित राज्यातून मात्र पाऊस उघडीप देताना दिसेल. 


हवामन विभागाच्या माहितीनुसार मागील काही तासांपासून बंगालच्या उपसागरातील बहुतांश क्षेत्रामध्ये कमी दाबाचे पट्टे तयार झाले असल्यामुळं हिमालयाच्या पायथ्यापासून थेट मध्य प्रदेशपर्यंत पावसानं दमदार हजेरी लावली. त्यातच सिक्कीमपासून महाराष्ट्रापर्यंतच्या कमी दाबाच्या पट्ट्यानं महाराष्ट्रातही पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती केल्याचं पाहायला मिळालं. सध्या राज्यात पावसाचं प्रमाण कमीजास्त आढळून येईल. 27 सप्टेंबरपर्यंत विदर्भाला मात्र पावसापासून पाठ सोडवता येणार नाहीये. 


मागील 24 तासांमधील पर्जन्यमानाविषयी सांगावं तर, नांदेड शहरासह जिल्हयात रविवारी सायंकाळी मुसळधार पावसानं हजेरी लावली. यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचलं. सोमवारसाठीही नांदेड जिल्हयासाठी हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तिथे हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र पाऊस झाल्याने सोयाबीन झेंडू हळद, कापूस या पिकांना जिवनदान मिळालं आहे. 


पाणीप्रश्न मिटला... 


नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारं मोरबे धरण समाधानकारक पाऊस झाल्यानं शंभर टक्के भरलं. धरणाने 88 मीटर जलसाठ्याची पातळी पार केली आहे. त्यामुळे धरणाचे दोन्ही दरवाजे 15 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. थोडक्यात मोरबे धरण भरल्यानं नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. 


पावसाचा परतीचा प्रवास कधी? 


सहसा सप्टेंबर महिना शेवटास जाऊ लागला की, परतीच्या पावसाचा प्रवास सुरु होतो. पण, महाराष्ट्रात सध्या बरसणारा पाऊस हा परतीचा नसून तो मान्सूनचात पाऊस आहे. 25 सप्टेंबरपासून राजस्थानमधून पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल. तर महाराष्ट्रातून मात्र हा प्रवास 10 ऑक्टोबरनंतरच सुरु होणार आहे.