पूरग्रस्तांची दुर्दशा संपेना : एटीएम बंद, जीवनावश्यक गोष्टीही विकत घेणं परवडेना
महापुरामुळे नेटवर्क बंद असल्याने एटीएम बंद आहेत
सांगली : सांगलीत पुराचा फटका आता आर्थिक व्यवहाराला बसलाय. कारण एटीएम बंद असल्याने लोकांना पैसे काढणं अवघड झालं आहे. आणि त्यातच आजपासून तीन दिवस बँकांना सुट्या असल्यामुळे, लोकांच्या अडचणीत वाढ होणार आहे. महापुरामुळे नेटवर्क बंद असल्याने एटीएम बंद आहेत. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे.
पूरग्रस्त ग्राहकांची लूट
पूरग्रस्त सांगली जिल्ह्यात सध्या दूध, पाणी, भाजीपाला आणि पेट्रोलची तीव्र टंचाई जाणवतेय. पुराचं पाणी ओसरल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सांगलीकरांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. तर दुसरीकडं भाजी आणि दूध विक्रेत्यांनी अव्वाच्या सव्वा दर उकळून ग्राहकांची लूट चालवलीय.
पिण्याच्या पाण्यासाठी लांबच लांब रांगा
महापुरात अर्ध्यापेक्षा अधिक सांगली जलमय झाली. व्यापारपेठेत पाणी शिरल्यानं व्यापार्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं... रस्त्यावर पाणी असल्यानं दूध, फळे, भाजीपाला, पेट्रोल, डिझेलची वाहतूक ठप्प झाली. काही पेट्रोलपंपावरील पेट्रोल, डिझेल संपलंय तर शिल्लक असणार्या पंपावर वाहनधारकांच्या लांबलचक रांगा लागल्यात. महापालिकेकडून पाणी पुरवठा होणार नसल्यानं अनेक ठिकाणी पेयजल केंद्रावर पाणी घेण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लागल्यात. दरम्यान, चौथ्या दिवशीही सांगली शहराला पुराचा विळखा कायम आहे.
राज्य प्रशासनाकडून पूरग्रस्त नागरिकांना तात्पुरता निवारा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात १८७ तर सांगली जिल्ह्यात ११७ तात्पुरता निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. तेथील लोकांना स्वच्छ पाणी, जेवणाची व्यवस्था, औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ४३ हजार ९२२ जनावरांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.