Maharashtra Rain : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पाऊस धुमाकूळ घालताना दिसतोय. तर, इथं महाराष्ट्रावर मात्र पाऊस काहीसा नाराज असल्याचं चित्र आता स्पष्ट होत आहे. तुम्हीही जर पाऊस आता तर परतेल असं म्हणत या श्रावणसरींवर दिलासा मानत असाल तर, तुमचा भ्रमनिरास होऊ शकतो. कारण, राज्यात पावसाच्या पुनरागमनाची तारीख पुन्हा एकदा लांबली आहे. हवामान विभागानं यावर शिक्कामोर्तब करत राज्यात सध्या मान्सूनच्या पावसासाठी पूरक वातावरण नसल्याचं स्पष्ट केलं. थोडक्यात ऑगस्ट महिन्यात तरी पाऊस अपेक्षाभंगच करताना दिसणार आहे. तर, सप्टेंबरमध्ये मात्र 7 तारखेनंतर तो राज्याच्या बहुतांश भागांमध्ये चांगला जोर धरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तूर्तास महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यासह कोल्हापूर, सातारा आणि पुण्यातील घाटमाथ्यावरील परिसरामध्ये पावसाच्या हलक्या सरीसह ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली. राज्यातील एकंदर पावसाचा अंदाज पाहता सध्याच्या घडीला बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांची मात्र कोंडी होताना दिसत आहेत. जून महिन्यात वेगानं सुरु झालेल्या शेतीच्या बहुतांश कामांचा वेग आता मंदावला आहे. त्यामुळं बळीराजा हवालदिल झाला आहे. 


1 सप्टेंबरनंतर राजस्थानातून पाऊस परतीची वाट धरणार असून, याचदरम्यान पुढील काही दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरावरून पूर्वेकडे पुन्हा एकदा नव्या कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती होणार आहे. ज्यामुळं त्यादरम्यानच राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होऊ शकतो. त्यामुळं यंदाचा गणेशोत्सव पाऊस गाजवणार असंच चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे. 


हेसुद्धा वाचा : India Today CVoter Survey: केंद्रात मोदींची सत्ता आली तरी INDIA ची ताकद वाढणार! राज्यात शिंदे- दादा अडचणीत 


मराठवाड्यात दुष्काळ... 


पावसाअभावी मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊसच नसल्यामुळं नांदेड, हिंगोली वगळता इतर सहा जिल्ह्यांमध्ये अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणंही आटली आहेत. सदरील परिस्थिती पाहता यावरच राज्याच्या कृषी विभागानं शुक्रवारी संभाजीनगरमध्ये आढावा बैठक आयोजित केली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत मराठवाड्यातील सगळेच मंत्री उपस्थित राहण्याची शक्यताय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित राहू शकतात.