Maharashtra Rain Updates : थैमान घालणाऱ्या पावसानं आता काहीशी विश्रांती घेतल्यामुळं अनेकांनीच पावसाच्या तावडीतून सुटका झाल्याचा नि:श्वास सोडला आहे. जवळपास संपूर्ण जुलै महिन्यात बरसणाऱ्या या पावसानं ऑगस्टच्या सुरुवातीस मात्र दडी मारली आहे. किंबहुना येते काही दिवस राज्यातील ठराविक भाग वगळता पर्जन्यमान तुरळक असेल असाच अंदाज हवामान विभागानंही वर्तवला आहे. पुढील दोन दिवसांसाठी राज्याच्या कोणत्याही जिल्ह्यांना रेड अथवा ऑरेंज अलर्टही देण्यात आलेला नाही. पण, काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून त्या भागांमध्ये पावसाच्या मध्यम ते तुरळक सरी बरसतील असंही सांगण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकण आणि विदर्भात पावसाच्या मध्यम स्वरुपातील सरी बरसतील तर काही भागांमध्ये मात्र उघडीप पाहायला मिळेल. तिथे कोल्हापुरात परिस्थिती वेगळी असून, राधानगरी धरणाचे तीन दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळं ही परिस्थिती उदभवल्याचं स्पष्ट होत आहे. 


ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सरासरीहून कमी पाऊस 


देशात जुलै महिन्यात सरासरीहून 13 टक्के जास्त पाऊस झाला. परंतू येत्या दिवसांमध्ये म्हणजेच मान्सूनला पोषक स्थिती नसल्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये मात्र सरासरीहून काही अंशी कमी म्हणजेच 92 टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत किनारपट्ट्यांचा परिसर, ईशान्य भारतातील काही ठिकाणांचा अपवाद वगळता देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


हेसुद्धा वाचा : मोदींच्या कार्यक्रमाला जाण्यावर शरद पवार ठाम! महाविकास आघाडीमध्ये नाराजी, संजय राऊत म्हणाले...


 


शेतीची कामं खोळंबणार 


सततच्या पावसामुळं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये निर्माण झालेली पूरस्थिती काहीशी अटोक्यात येत असली तरीही कमी पर्जन्यमानाचा फटका शेतकामांवर होताना दिसणार आहे. ज्यामुळं शेतकऱ्यांपुढं नवी आव्हानं उभी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑगस्टचा पहिला आठवडा वगळता संपूर्ण महिनाच पावसाविना असल्यामुळं आता हा वरुणराजा पुन्हा केव्हा त्याची कृपा दाखवणार हाच प्रश्न अनेकांना पडत आहे. 


हवामान विभागाच्या माहितीनुसार मध्य भारतामधील पावसाचं प्रमाण कमी होण्याची चिन्हं असून दरम्यानच्या काळात पॅसिफिक समुद्रात सक्रिय असणारा अन निनो आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी तापमानातही काही अंशांनी वाढ होण्याची चिन्हं आहेत.