पुढील काही तास अतिवृष्टीचे; मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रासाठी `रेड अलर्ट`
Maharashtra Rain Updates : जुलै महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांनंतर पावसानं महाराष्ट्रात जोर पकडला आणि अनेकांचीच त्रेधातिरपीट उडाली. हाच पाऊस पुढील 24 तासांमध्ये धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Maharashtra Rain Updates : जुलै महिन्यात चांगल्याच जोर धरलेल्या पावसानं आता आणखी रौद्र रुप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या साधारण 12 ते 13 दिवसांपासून मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढल्यामुळं बहुतांश भागांमध्ये आता पूरसदृश परिस्थितीही निर्माण झाली आहे. थोडक्याच लख्ख सूर्यप्रकाशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्वांनाच पावसाचा मारा सोसावा लागत आहे. त्यातच पुढील काही तासांसाठी हवामान विभागाकडून मुंबई शहर विभागासह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. परिणामी पुढील काही तास अतीवृष्टीचे असतील हेच आता स्पष्ट होत आहे. किंबहुना गुरुवारी पहाटेपासून या भागांमध्ये मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे.
मुंबईच्या उपनगरीय भागात मात्र पावसाची उघडीप सुरु असल्यामुळं पावसाची ये-जा नागरिकांना सतावताना दिसत आहे. तिथं रायगड जिल्ह्यात बुधवारपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. ज्यामुळं हवामान विभागाने इथं रेड अलर्ट जारी केला आहे. सध्याच्या घडीला रायगडमधील नद्यांचं पाणी इशारा पातळीच्या खाली असलं तरी जिल्हा प्रशासनाने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
शाळांना सुट्टी
मुंबईत दिलेला पावसाचा इशारा पाहता मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना आणि सर्व महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी या वेळेत गरज असेल तरच घराबाहेर पडावं असंही आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तिथं ठाण्यातही परिस्थिती वेगळी नसून, जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हेसुद्धा वाचा : माथेरानच्या पायथ्याशी शेतांमध्ये 50 ते 100 फूट लांबच्या भेगांमुळं दहशतीचं वातावरण
विदर्भातही मुसळधार
पूर्व विदर्भात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून, नागपूरसह विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपुरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. तर, नरेंद्र नगर रेल्वे ब्रीज खालील रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रस्ता दोन्ही बाजूने बंद करण्यात आला होता.
तिथे कोल्हापुरात राधानगरी धरण 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले असून, 8 हजार 540 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाचे चार दरवाजे उघडल्यानंतर प्रशासनानं काही गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.