Maharashtra Rain : राज्यात पुन्हा मोसमी पाऊस सक्रिय होण्याची चिन्हं आहेत. 5 सप्टेंबरनंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं (Maharashtra Rain Update) वर्तवलाय. अनेक दिवसांपासून रुसून बसलेला पाऊस पुन्हा एकदा राज्यावर कृपा करणार आहे. येत्या 24 तासांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत (Maharashtra Weather Update)  कोकण आणि गोव्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार होणार आहे.  तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वरुणराजा हजेरी लावण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. (maharashtra rain updates mumbai pune marathwada vidarbha kokan heavy rain News in marathi )




नागपूर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर नागपुरात सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळला.. यामुळे उकाड्याने त्रस्त नागपूरकरांना दिलासा मिळाला. मात्र या पावसाने पुरती दाणादाणही उडवली. अनेक ठिकाणी पावसामुळे झाडं कोसळली. तसंच काही ठिकाणी वीजही गायब झाली. दरम्यान हवामान विभागाने नागपुरात यलो अलर्ट दिलाय. 


चंद्रपूर 


चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन झालं. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळल्याने चंद्रपुरात पुन्हा एकदा गारवा निर्माण झाला. जिल्ह्यात गेले 25 दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती. सोयाबीन, कापूस आणि धान पीक सुकत चाललं असताना, या पावसानं पिकांना जीवदान मिळालंय. 


भंडारा


भंडारा जिल्ह्यात अखेर 15 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात वादळी वा-यासह पाऊस बरसला. यामुळे शेतक-यांना काहीसा दिलासा मिळालाय. मात्र अजूनही बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. 



गोंदिया


गोंदियात 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे उकाड्यानं त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. तसंच या पावसामुळे धान पिकांनाही नक्कीच फायदा होणार आहे. 


लातूर 


लातूर शहरासह पेट, येरोळ, अहमदपूर भागात संध्याकाळपासून अचानकपणे पावसाला सुरुवात झाली. मागील एक महिन्यापासून पावसानं दडी मारल्यानं इथले शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. अखेर पावसानं हजेरी लावल्यानं पिकांना थोडासा दिलासा मिळालाय. मात्र अजूनही मोठ्या पावसाकडे बळीराजा डोळे लावून बसलाय. 


पंढरपूर 


पंढरपुरात दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. गेल्या महिनाभरापासून दडी मारलेला पाऊस बरसल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त केला. तर आणखी काही दिवस असाच पाऊस पडावा अशी इच्छा शेतक-यांनी विठुरायाच्या चरणी व्यक्त केलीय.


नाशिक 


नाशिकच्या येवल्यात दडी मारून बसलेल्या पावसाने हजेरी लावली. येवला आणि पाटोदा या दोन्ही तालुक्याच्या सीमेवर असलेल्या गाव परिसरात जोरदार पाऊस बरसला. यामुळे शेतक-यांमध्ये आनंदाचं वातावरण असलं, तरी अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा बळीराजा करतोय. 


बारामती


अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुणे जिल्ह्यातील बारामती शहर, इंदापूर तालुका आणि परिसरात पावसाला सुरुवात झाली. सकाळपासून बारामती शहर आणि परिसरात कमालीचा उकाडा जाणवत होता. मात्र यापावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली. 


शिरुर 


सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण 93 टक्के भरलंय. मात्र या धरणावरती अवलंबून असलेल्या शिरूर आंबेगाव पारनेर तालुक्यातील सर्वच परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाची गंभीर परिस्थिती आहे, त्यामुळे पाण्याचं नियोजन करण्याची गरज आहे.