उमेश परब, झी मीडिया सिंधुदुर्ग  : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुर्णाकृती पुतळा (Chatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळला.  4 डिसेंबर 2023 रोजी मालवणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. मात्र कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळलाय. त्यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केलीय. यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईकांनी (Vaibhav Naik) तर थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय गाठलं आणि तोडफोड केली..सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच या पुतळ्याची देखभाल आणि निगा राखण्याची जबाबदारी होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आठ महिन्यांपूर्वी पुतळा बदलण्याची मागणी
मालवण किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बदलण्याची मागणी संभाजीराजे छत्रपतींनी 8 महिन्यांआधीच केली होती. मात्र त्यावर काहीच कारवाई झाली नव्हती. तेव्हा आता पुतळा कोसळल्यामुळे संभाजीराजेंनी संताप व्यक्त केलाय. पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला. घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार? पुन्हा त्या ठिकाणी महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचे आहे.  निवडणुकीच्या घाईगडबडीत उभारू नये. उशीर होऊ दे मात्र शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे अशी मागणी छत्रपती संभाजीराजेंनी केलीय.


कंत्राटदारावर कारवाई करा
तर ज्या कंत्राटदाराने पुतळा उभारला त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केलीय. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज कोसळला, तो पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते. त्याने आपले काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे. हि व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकायला हवे, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केलीय.


तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात घोटाळा करणाऱ्यांना माफी नसल्याचा इशाराच मनोज जरांगेंनी दिलाय.  दैवताचा सन्मान कसा ठेवायचा हेही यांना कळत नाही असं म्हणत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात घोटाळा करणाऱ्यांना सुट्टी द्यायला नको, या सर्व प्रकरणाची चौकशी व्हायला हवी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलीय. दुसरीकडे यावरुन राजकारणही सुरु झालंय. पुतळा कोसळणे हा राजकीय कट असल्याचा मोठा आरोप स्थानिक भाजप नेत्याने केलाय. मालिकांमध्ये शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे खासदार अमोल कोल्हेंनी शिवरायांचा पुतळा पुन्हा सन्मानाने उभारण्यात यावा.. मात्र कामाचा दर्जासोबत कोणतीही तडजोड करु नये अशी इच्छा व्यक्त केलीय..


मालवण किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे स्वराज्याच्या तो पहिला जलदुर्ग होता. याच मालवण किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे पाहायला मिळतात. मालवण किल्ल्यावर शिवाजी महाराजांचं जगातलं एकमेव मंदिर आहे. त्यामुळे आता मालवण किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा एकदा सन्मानाने उभारावा अशीच तमाम शिवप्रेमींची इच्छा आहे.