मुंबई : देशातील आणि राज्यातील कोरोनाची स्थिती चिंताजनक असल्याची आकडेवारी समोर आली आहे. आज एका दिवसात राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत तब्बल १६ हजार ८६७नी वाढ झालीये. ही आजवरची सर्वात मोठी वाढ आहे. तर देशभरातही २४ तासांमध्ये तब्बल ७६ हजार ४७२ नवे रुग्ण आढळले असून ही आजवरची जगभरातील सर्वात मोठी वाढ ठरली आहे. दिवसभरात राज्यातील ३२८ जणांचा जीव गेला असून ११ हजार ५४१ रुग्णांनी कोरोनावर मात केलीये. राज्याचा रिकव्हरी रेट ७२ पूर्णांक ५८वर गेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ७,६४,२८१ एवढी झाली आहे, यापैकी १,८५,१३१ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. तर आजपर्यंत ५,५४,७११ जण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आत्तापर्यंत २४,१०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातला सध्याचा मृत्यूदर हा ३.१५ टक्के एवढा आहे. 


महाराष्ट्रात सध्या पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचे सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा ४९,३६५ एवढा आहे. तर ठाण्यामध्ये २०,२६४ आणि मुंबईमध्ये कोरोनाचे १९,९७१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 


पुणे मनपा क्षेत्रात आजच्या एका दिवसात १,९७२ रुग्णांची नोंद झाली आहे, यामुळे कोरोना बाधितांचा आकडा ९८,५७३ एवढा झाला आहे. पुणे मनपा क्षेत्रात आजच्या एका दिवसात ३२ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे एकूण मृतांची संख्या २,५०७ एवढी झाली आहे. 


मुंबईमध्ये आजच्या दिवसभरात कोरोनाचे १४३२ रुग्ण आढळले, तर ३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईतली कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ७,५९६ एवढी झाली आहे.