Thane Drugs Racket : तुमचं तुमच्या मुलांकडे लक्ष आहे का? असा सवाल उपस्थित करत मनसे कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांनी ठाण्यातील ड्रग्स रॅकेटबाबत धक्कादायक माहिती समोर आणली आहे. ठाण्यात तब्बल चार ते पाच ठिकाणी एमडी नावाचं ड्रग्सची (MD Drugs) विक्री केली जात असल्याचं धक्कादायक वास्तव त्यांनी मांडलंय. कल्याण डोंबवलीवरून एमडी ड्रग्सचं आता ग्रामीण भागातही पोहचलं आहे. ठाण्यात ड्रग्सची सर्रास विक्री होत असून यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि पोलीस विभागाने कारवाई करावी अशी मागणी पानसे यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठी यंत्रणा कामाला
ठाण्यात 4 ते 5 ठिकाणी एमडी ड्रग्जची विक्री केली जात असून मुलांना ड्रग्जच्या विळख्यात अडकवण्यासाठी मोठी यंत्रणा कामाला लागलीय, असा दावाही पानसे यांनी केला आहे. ठाण्यात कळवा ब्रीज, आंबेडकर रोड कॉर्नर, ब्रम्हांड, हिरानंदानी इस्टेट, वागळे इस्टेट 16 नंबरमध्ये ड्रग्जची तस्करी होत असून, एमडी ड्रग्ज 200 ते 1200 रुपयांना विकलं जातंय हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं अशी मागणीही पानसेंनी केलीय.


बदलापूरमधील तरुणाला अटक
याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात ठाण्यात ड्रग्स विक्री करणाऱ्या बदलापूरच्या एका तरुणाला अटक करण्यात आली होती. सोशल मीडियावरच्या इन्स्टाग्रामवरुन अकाऊंटवरुन हा तरुण ड्रग्सची विक्री करत होता. त्याच्याकडून 60 किलो गांजा, चरस आणि चरस तेलाच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या. सिगारेट पिताना चरस तेलाचा वापर केला जातो. याची नशा अधिक प्रमाणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. 


नाशिकमध्ये गांजा जप्त
दरम्यान, नाशिकच्या वडाळा गावात नाशिक शहर पोलिसांनी कारवाई करत लाखोंचा गांजा जप्त केलाय. पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाची किंमत 4 लाख 21 हजारांच्या घरात आहे. याप्रकरणी संशयित आरोपी शाहरुख शाहला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या चौकशीतून गांजा विक्रीचं मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे..