Maharashtra Samruddhi Mahamarg : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर वाहनधारकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागपूर ते शिर्डी (Nagpur-Shirdi) दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात तब्बल 50 हजारांहुन अधिक वाहनांनी महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) प्रवास केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते महाराष्ट्र समृद्धी महामार्गामधील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं 11 डिसेंबर,2022 ला उद्घाटन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (DCM Devendra Fadanvis) तसंच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यानंतर दुपारी 2 वाजता द्रुतगती मार्ग वाहतुकीस सर्वांना खुला करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर ते शिर्डी या 520 कि.मी. च्या टप्प्यात शुक्रवारपर्यंत 50 हजारांहुन अधिक वाहनांनी प्रवास केला आहे. द्रुतगती मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनधारक आणि चालकांची कुठेही गैरसोय होऊ नये, याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) पुरेपुर काळजी घेतलेली आहे


महामार्गावर इंधनाची सुविधा
समृद्धी महामार्गावर नागपूरहून शिर्डीच्या दिशेने 7 ठिकाणी आणि शिर्डीहुन नागपूरच्या दिशेने 6 ठिकाणी अशा एकूण 13 ठिकाणी इंधनाची (Fuel) सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 


महामार्गावर स्नॅक्सची सुविधा
ज्या ठिकाणी इंधन स्थानक आहेत, त्या ठिकाणी स्नॅक्स (Snaks), पिण्याचं पाणी तसंच टायर पंक्चर काढण्यासाठी आणि टायरमध्ये हवा भरण्यासाठी सोय करण्यात आलेली आहे. तसंच वाहनाच्या किरकोळ दुरुस्तीची सुविधा इंधन स्थानकाजवळ पुरवण्यात आली आहे. याशिवाय 16 ठिकाणी महामार्ग सोयी सुविधा (Way side Amenities) सुरु करण्याची प्रक्रिया सुरु असून लवकरच प्रवाशांना ती सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. या 13 इंधन स्थानकांवर प्रसाधनगृहाची सुविधा आहे. तसंच पथकर स्थानकांवर देखील प्रसाधन गृहांची सुविधा आहे


अपघात झाल्यास खबरदारी


- शीघ्र प्रतिसाद वाहने (QRV) एकूण 21 वाहने
द्रुतगती मार्गावर इंटरचेंजवर 21 सुसज्ज शीघ्र प्रतिसाद वाहनं तैनात आहेत. घटना घडल्यानंतर तातडीने अपघातस्थळी ही वाहने पोहचतील. या वाहनामध्ये रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी तसंच घटना नियंत्रण करण्यासाठी फायर फायटिंग सिस्टिम, कटर्स, ऑक्स‍िजन सिलिंडर्स, हायड्रॉलिक जॅक, प्रथमोपचार सुविधा व उपकरणे इ. अत्याधुनिक सुविधा ठेवण्यात आलेल्या आहेत


- क्रेन
अपघातग्रस्त वाहन द्रुतगती मार्गावरुन बाजूला घेण्यासाठी 30 मेट्रिक टन क्षमतेची क्रेन 24 तास तैनात आहे. अपघाताची सूचना मिळताच क्रेन तातडीने घटनास्थळी पोहचेल. क्रेनची एकूण संख्या 13 आहे


- गस्त वाहने
प्रवाशांच्या मदतीसाठी एकूण 13 गस्त वाहने कार्यरत आहेत. अपघातानंतर वाहतूक नियंत्रित करण्याच्या दृष्टीने द्रुतगती मार्गावर आवश्यक सुरक्षा उपाययोजना गस्त वाहनांमधील कर्मचारी करतील


- सुरक्षा रक्षक
द्रुतगती मार्गावर सुरक्षेसाठी महामार्ग सुरक्षा पोलीस (Highway Safety Police) तैनात आहेत. तसंच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे एकूण 121 सुरक्षा रक्षक महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या मदतीसाठी नियुक्त केलेले आहेत


- रुग्णवाहिका
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी एकूण 15 रुग्ण वाहिका आहेत. रुग्णवाहिका स्थानिक रुग्णालयांशी संलग्न ठेवण्यात आलेल्या आहेत. आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी रुग्णवाहिकेकरिता 108 क्रमांकावर संपर्क करावा


- हेल्पलाईन क्रमांक
वाहनाचा बिघाड / अपघात झाल्यास हेल्पलाईन क्रमांक 1800 233 2233/ 8181818155 वर त्वरीत संपर्क करावा. सदर हेल्पलाईन क्रमांक महामार्गावर ठिकठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेले आहेत


- नियंत्रण कक्ष व मुख्य नियंत्रण कक्ष
नागपूर ते शिर्डी दरम्यान समृद्धी महामार्गावर प्रत्येक इंटरचेजच्या ठिकाणी स्वंतत्र नियंत्रण प्रणाली असून ते मुख्य नियंत्रण कक्षाशी संलग्न आहेत. औरंगाबादमधील सांवगी इंटरचेंज येथे मुख्य नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आलेला असून सर्व सुविधा यंत्रणावर बारकाईने लक्ष दिले जात आहे.


- सुरक्षित प्रवासासाठी, नियमांचे पालन गरजेचे
अपघात होऊ नये आणि सुरक्षित प्रवास होण्याच्या दृष्टीने प्रवाशांनी काळजी घेणे आवश्यक आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी वाहनाचे इंजिन, इलेक्ट्रीक वायरिंग, टायर्स इ. सुस्थितीत असण्याची खात्री करणे. द्रृतगती मार्गावर वाहनाची गती विहित मर्यादित ठेवणे, जेणेकरुन सुरक्षित प्रवास होईल. लेनची शिस्त पाळणे, चूकीच्या बाजूने ओव्हरटेक करु नये, मुख्य मार्गिकेवर वाहने पार्क करु नये, दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, सीट बेल्ट वापरणे इ. बाबीचे काळजीपूर्वक पालन करणे गरजेचं आहे.