राज्यात अखेर शाळेची घंटा वाजली, या 5 जिल्ह्यात शाळा गजबजल्या
कोरोना काळात अखेर शाळेची घंटा वाजली आहे.
लातूर, परभणी, गोंदिया : कोरोनाच्या (Coronavirus) पहिल्या लाटेनंतर राज्यातील शाळा (School), महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. अद्याप जवळपास सगळ्याच शाळा बंद आहेत. मात्र, आता दुसऱ्या लाटेचा जोर ओसरल्यानंतर काही जिल्ह्यांत शाळा सुरु (Schools Started) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उत्तर महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात तसेच मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भातील (Vidarbha) काही जिल्ह्यात या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोना काळात अखेर शाळेची घंटा वाजली आहे. (Maharashtra School reopens)
परभणीत अखेर शाळेची घंटा वाजली
परभणी जिल्ह्यात आज अखेर शाळेची घंटा वाजली. राज्य शासनाने आजपासून 8वी ते 12 वीच्या शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे. परभणी जिल्ह्यात 843 शाळांपैकी कोरोनाचे सर्व नियम पाळून 500 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी 50 टक्के विद्यार्थी उपस्थिती होती. मास्क सॅनिटायरचा वापर करूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला गेला.
लातूर येथे 8वी ते 10 वीचे वर्ग भरले
लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी शाळा भरली आहे. निलंगा तालुक्यातील दापका येथील जय भारत विद्यालयात 8वी ते 10 वीचे वर्ग भरले. विद्यार्थी संख्या अत्यल्प असली तरी कोरोना नियमांचे पालन करून ही शाळा भरविण्यात आली. विद्यार्थी, शिक्षकांची प्राथमिक तपासणी करूनच शाळेत प्रवेश देण्यात आला. ऑनलाईन अभ्यासाला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना यावर्षी पहिल्यांदाच शाळेत आल्याचा उत्साह आणि आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
कोरोनामुक्त गावांमध्ये 8 वी ते 12 वीचे वर्ग
वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 275 शाळांपैकी कोरोनामुक्त गावांमध्ये 8 वी ते 12 वीच्या शाळा सुरू करण्याची तयारी वाशिम शिक्षण विभागाने केली आहे. यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समितीचे आणि ग्रामपंचायतींचे ठराव शिक्षण विभागाकडून मागविण्यात आले होते.यामध्ये 73 शाळांनी सर्व प्रक्रिया पार पाडल्याने जिल्ह्यातील 275 पैकी आज 73 शाळांना शाळा सुरू करण्याची परवानगी मिळाली. मात्र विद्य्यार्त्यांचा पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद होता.
दुर्गम भागात पुन्हा शाळा गजबजल्या
गोंदिया जिल्ह्यात आदिवासी, नक्षलग्रस्त दुर्गम भागात पुन्हा शाळा गजबजल्या आहेत. 142 शाळा सुरू करण्यास प्रशासनानं परवानगी दिली आहे. जिल्ह्यातील 372 शाळापैकी 142 शाळांचे ठराव शिक्षण विभागाला प्राप्त झाले त्यानुसार 142 शाळा ह्या जिल्ह्यात सुरू झाल्यात. विद्यार्थ्यांकडून हमीपत्र घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला.
दरम्यान, कोरोना काळात शाळेची फी कमी करण्यासाठी पालकांनी केलेल्या आंदोलनामुळे संतापलेल्या शाळा प्रशासनाने शाळेतील विद्यार्थ्याला काढून टाकले, असा आरोप पालकांनी केला आहे. डोंबिवली पूर्वेकडील सोनारपाडा परिसरातील शंकरा शाळेत हा प्रकार घडला आहे. या आरोपांचे शाळा प्रशासनाने मात्र खंडण केले आहे.